महाबळेश्वरच्या बोटी भ्रष्टाचाराच्या गाळात

By admin | Published: January 29, 2017 10:43 PM2017-01-29T22:43:41+5:302017-01-29T22:43:41+5:30

!पाच कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश : नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवकांच्या अचानक भेटीनंतर परिसरात खळबळ

Mahabaleshwar's boat in the grip of corruption | महाबळेश्वरच्या बोटी भ्रष्टाचाराच्या गाळात

महाबळेश्वरच्या बोटी भ्रष्टाचाराच्या गाळात

Next


महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील वेण्णा लेकच्या बोट क्लबमधील गैरव्यवहाराची माहिती मिळताच नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी आशा राऊत व नगरसेवक कुमार शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी सर्जिकल स्ट्राईक करत बोट क्लबला अचानक भेट दिली. यावेळी आर्थिक व्यवहारात मोठी तफावत आढळून आल्यानंतर पाच कर्मचाऱ्यांची चौकशी करुन निलंबित करावेत असे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी दिलेली माहिती अशी की, ‘महाबळेश्वर पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन म्हणून वेण्णा लेक बोट क्लबकडे पाहिले जाते. वेण्णा बोटक्लबला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र असून, महाबळेश्वरात दाखल होणारे प्रत्येक पर्यटक याठिकाणी नौकाविहाराचा आनंद लुटतात. येथे पालिकेने पँडल व रोइंग बोटीची सोय केली आहे. हे ठिकाण खाऊगल्लीसाठी मोक्याचे असल्याने येथे नेमणूक मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये चढाओढ लागते. येथील गैरव्यवहार अनेकवेळा उघडकीस येऊनही कारवाई शून्य झाल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात होता. मात्र, प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली नव्हती.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी येथे नवीन तंत्रज्ञानाची डिजिटल यंत्रणा बसविली असली तरीही भ्रष्टाचाराच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत.
या संदर्भात दोन आठवड्यांपूर्वी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी आशा राऊत, सर्व नगरसेवक व पालिकेचे विविध खात्यांतील प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आर्थिक अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. तरीही याकडे दुर्लक्ष होत होते. यासंदर्भात नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्याकडील तक्रारींचा ओघ वाढला होता.
अहमदाबाद येथील एका पर्यटकाने या संदर्भात नगराध्यक्षांकडे तक्रार केली. या तक्रारीची गांभिर्याने दखल घेण्यात आली.
नगराध्यक्षा शिंदे, मुख्याधिकारी राऊत, नगरसेवक कुमार शिंदे यांनी शनिवारी बोट क्लबला अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गर्दीच्या वेळी सायंकाळी साडेसात वाजता ही मंडळी बोट क्लबवर पोहोचली.
नगराध्यक्षांनी बुकिंग काउंटर तर मुख्याधिकाऱ्यांनी रिफंड काउंटरचा ताबा घेतला. नगरसेवक शिंदे यांनी जेटीवर लक्ष ठेवले. बोट क्लबवर छापा पडल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांमध्ये चुळबूळ सुरू झाली. आठ वाजता क्लब बंद झाल्यानंतर सर्व व्यवहारांची तपासणी केली. कर्मचारी, बोटमन यांचे हजेरी पत्रक व कामकाजाच्या नोंदीची तपासणी केली असता मोठी तफावत आढळली. (प्रतिनिधी)
गैरहजर कर्मचारीही कामावर...
बोट क्लबवर कायम २४ तर कंत्राटी ४० बोटमन आहेत. यापैकी अनेक बोटमन गैरहजर असतानाही त्यांनी बोटींच्या फेरी मारल्याच्या नोंदी आढळल्या. तर अनेक कर्मचारी हजर असतानाही त्यांनी गर्दी असतानाही एकही फेरी मारली नाही, अशा अनेक नोंदी आढळून आल्या. अनियमितेच्या अनेक नोंदी आढळल्या असून, या सर्व गैरव्यवहाराचा मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. येथील आर्थिक गैरव्यवहारासाठी पाच लिपिकांना प्रथमदर्शनी जबाबदार धरले असून, त्यांच्या चौकशीचे आदेश नगराध्यक्षा शिंदे यांनी दिले आहेत.
साडेसहा हजार बेहिशोबी
बोट क्लबचा दिवसाचा व्यवसाय २ लाख १८ हजार ७० रुपये झाला होता; परंतु प्रत्यक्ष प्रत्येक्षात २ लाख २४ हजार ६४० रुपये आढळले. जादाच्या ६,५७० रुपयांच्या व्यवहाराची कोठेही नोंद नव्हती.

Web Title: Mahabaleshwar's boat in the grip of corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.