महाबळेश्वरचे आठ नगरसेवक अपात्र
By admin | Published: September 29, 2016 12:31 AM2016-09-29T00:31:12+5:302016-09-29T00:31:36+5:30
नगराध्यक्षांचाही समावेश : बावळेकरांच्या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल
महाबळेश्वर : सत्ता मिळविण्यासाठी कधी आघाडी तर कधी अपक्ष नगरसेवक म्हणून पालिकेत कामकाज केल्याबद्दल महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निकाल जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी केलेल्या तक्रारीवर हा निकाल देण्यात आला.
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम ७ व १९८७ च्या नियम ८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार स्वेच्छेने आघाडीचा त्याग केल्याच्या कारणास्तव कुमार गोरखनाथ शिंदे, संदीप वसंत साळुंखे, प्रकाश रामचंद्र पाटील, संगीता दत्तात्रय वाडकर, सुरेखा प्रशांत आखाडे, उज्ज्वला रतिकांत तोष्णीवाल, लीला मानकुंबरे व विमल पांडुरंग पार्टे या आठजणांना अनर्ह घोषित करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.
या आदेशान्वये हे आठही जण नगरसेवक म्हणून काम करण्यास अपात्र ठरले आहेत. या निकलामुळे महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत असून, यामुळे महाबळेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)