महाबळेश्वरचा पारा १२ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:19+5:302021-02-10T04:39:19+5:30
महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वरात थंडीची तीव्रता वाढली असून, रात्री व पहाटेच्या सुमारास नागरिकांना अक्षरश: हुडहुडी भरत आहे. मंगळवारी ...
महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वरात थंडीची तीव्रता वाढली असून, रात्री व पहाटेच्या सुमारास नागरिकांना अक्षरश: हुडहुडी भरत आहे. मंगळवारी हवामान विभागाने महाबळेश्वरचे कमाल तापमान २६.६, तर किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. महाबळेश्वरचा पारा अचानक खालावल्याने पर्यटक या थंड वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
वाहतुकीचा खोळंबा
फलटण : येथील बसस्थानक तसेच रिंंगरोड परिसरात वाहतुकीचा सतत खोळंबा होत आहे. काही वाहनधारक रस्त्याकडेलाच वाहन पार्क करत असल्याने बऱ्याचदा ट्रॅफिक जाम होत आहे. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे देखील वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ओढ्यांची स्वच्छता
सातारा : सातारा पालिकेकडून पुन्हा एकदा ओढे व नाल्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभर मल्हारपेठ परिसरातील ओढ्यांची स्वच्छता करण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने येथील नैसर्गिक ओढे गाळ व कचरामुक्त करण्यात आले. कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने या ओढ्यांमधील व नाल्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. नागरिकांमधून तक्रारी प्राप्त होताच पालिकेने ओढे स्वच्छतेचे काम हाती घेतले.
कचरा रस्त्यावर
शेंद्रे : सातारा शहरातून संकलित केला जाणारा कचरा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत असल्याने याचा सोनगाव, शेंद्रे परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डेपोच्या बाहेर रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचत आहेत. शिवाय संरक्षक भिंतीखालूनही हा कचरा रस्त्यावर येत आहे.
कारवाईला ब्रेक
सातारा : मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पालिकेकडून सुरू करण्यात आलेली कारवाईची मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
पालिकेकडून सुरुवातीला दंडात्मक कारवाईची मोहीम काटेकोरपणे राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम बंद झाल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
कर्कश्श हॉर्नचा गोंगाट
सातारा : कर्कश्श आवाजाचा हॉर्न असलेल्या वाहनचालकांविरोधात शहरात वाहतूक शाखेने सुरू केलेली कारवाईची मोहीम बंद करण्यात आली आहे. या कारवाईची वाहनधारकांनी धास्ती घेतली होती. ही मोहीम बंद असल्याने नागरिकांना पुन्हा कर्कश्श हॉर्नचा त्रास सहन करावा लागत असल्याने ही मोहीम सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे.
रस्त्यावर खड्डेच खड्डे
मेढा : केळघर-मेढा मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या कामामुळे केळघर-मेढा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे चुकविताना वाहनधारकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. केळघर-महाबळेश्वर या मार्गाची अवस्थाही भीषण झाली असून, खड्ड्यांची तातडीने डागडुजी करून वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे.