महाबळेश्वरचा पारा १७ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:35+5:302021-07-07T04:47:35+5:30
महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाबरोबरच थंडीची तीव्रतादेखील हळूहळू वाढू ...
महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाबरोबरच थंडीची तीव्रतादेखील हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरू लागली आहे. सोमवारी हवामान विभागाने महाबळेश्वरचे कमाल तापमान २४ तर किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी महाबळेश्वरात पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटक अधूनमधून भेट देत आहेत.
वर्ये पुलावर घाणीचे साम्राज्य
किडगाव : सातारा - वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वर्येसह परिसरातील अनेक ग्रामस्थ येता-जाता पुलाजवळ कचरा टाकून पुढे निघून जातात. कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून, वेण्णा नदीपात्राचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने या परिसराची तातडीने स्वच्छता करावी तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
सातारा शहरात स्वच्छता मोहीम
सातारा : डेंग्यू, मलेरिया तसेच साथरोगांच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. आरोग्य विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी जंतुनाशक औषध व फॉगिंग मशीनद्वारे धूरफवारणी केली जात आहे. या व्यतिरिक्त पथकाने नाले व ओढे स्वच्छतेचे कामही हाती घेतले आहे. शहरातील सदर बझार, माची पेठ, केसरकर पेठ, मल्हारपेठ या भागात ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
अंबेनळी घाटातील कठड्यांची पडझड
महाबळेश्वर : महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावर असलेल्या अंबेनळी घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच घाटातील रस्त्याचीही ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा घाटरस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. त्यामुळे बांधकाम विभागाने संरक्षक कठड्यांसह रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे.
सातारा पालिकेच्या कारवाईला ‘ब्रेक’
सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापारणाऱ्यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. पालिकेकडून काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे.