महाबळेश्वरचा पारा घसरला!, यंदाच्या हंगामातील निचांकी तापमान
By नितीन काळेल | Published: November 21, 2022 01:06 PM2022-11-21T13:06:15+5:302022-11-21T13:07:17+5:30
थंडगार वारे वाहत असल्याने जिल्ह्यात हुडहुडी वाढली
सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात उतार येत असून महाबळेश्वरचा पारा आणखी घसरला. सोमवारी तर १०.०४ अंशाची नोंद झाली. त्यातच थंडगार वारे वाहत असल्याने जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. तर महाबळेश्वरातील सोमवारचे किमान तापमान यंदाच्या हंगामातील निचांकी ठरले आहे.
जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून थंडी जाणवत आहे. पण, मागील आठ दिवसांत थंडीचा जोर वाढला आहे. सातारा शहराबरोबरच महाबळेश्वरच्याही किमान तापमानात उतार आला आहे. त्यातच उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. यामुळे दिवसाही अंगातून थंडी जाईना अशी स्थिती आहे. त्याचबरोबर मागील दोन दिवसांत पारा आणखी घसरला. परिणामी हुडहुडीत वाढच झाली आहे.
सातारा शहराचे १६ नोव्हेंबरला किमान तापमान १५.०५ अंशावर होते. त्यानंतर उतार येत गेला. रविवारी तर साताऱ्याचा पारा १२.०६ अंशावर होता. हे किमान तापमान या हंगामातील नीचांकी ठरले. मात्र, सोमवारी साताऱ्याचा पारा वाढून १३ अंश नोंद झाला. पण, थंड वारे वाहत आहेत. तर महाबळेश्वरच्या तापमानात उतार आला आहे. रविवारी १०.०६ अंश तापमानाची नोंद झाली. मात्र, सोमवारी आणखी घसरुन १०.०४ अंशाची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील थंडीत वाढ झाली आहे.
महाबळेश्वर शहरात नोंद किमान तापमान असे :
दि. ११ नोव्हेंबर १३.०६, दि. १२ - १३.०९, दि. १३ - १३.०४, दि. १४ - १६, दि. १५ - १५.०४, दि. १६ - १३.०९, दि. १७ - १२.०८, दि. १८ - १२, दि. १९ - १२.०५, दि. २० - १०.०६ आणि दि. २१ नोव्हेंबर १०.०४