महादरेचा रस्ता पन्नास वर्षांनंतर प्रकाशमान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:46 AM2021-09-09T04:46:54+5:302021-09-09T04:46:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गेल्या पन्नास वर्षांपासून पथदिव्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या महादरेवासीयांचे स्वप्न अखेर पूर्णत्वास आले आहे. केसकर कॉलनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गेल्या पन्नास वर्षांपासून पथदिव्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या महादरेवासीयांचे स्वप्न अखेर पूर्णत्वास आले आहे. केसकर कॉलनी ते महादरे या रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, दोन किलोमीटरच्या रस्त्यावर पथदिवे उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल पन्नास वर्षांनंतर हा रस्ता प्रकाशमान होणार असल्याने ग्रामस्थांचे चेहरेही आनंदाने फुलले आहेत.
सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित होता. सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनही नगरविकास विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला नव्हता. त्यामुळे सातारा शहर, उपनगर व त्रिशंकू भागाच्या विकासावर दूरगामी परिणाम झाले होते. अखेर ८ सप्टेंबर २०२० रोजी शासनाने हद्दवाढीच्या अंतिम प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाला आता वर्षपूर्ती होत आहे. दरे खुर्द ते यवतेश्वर पायथा, शाहुपुुरी, विलासपूर, करंजे, गोडोली खेड येथील काही भाग पालिकेच्या हद्दीत आला आहे. हद्दवाढ होताच पालिका प्रशासनाने वाढीव भागातील मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला आहे.
यवतेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या महादरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. पूर्वी हा रस्ता तीन मीटर होता, आता तो नऊ मीटर रुंद होणार आहे. केसकर कॉलनी ते महादरे या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर आजवर कधीच पथदिवे लागले नाहीत. मात्र, आता हा रस्ता प्रकाशमान होणार आहे. नगरसेवक वसंत लेवे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार या रस्त्यावर तीस पथदिवे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तब्बल पन्नास वर्षांनंतर हा रस्ता दिव्यांनी उजळून निघणार आहे. या गावचा विकास साधण्यासाठी नगरोत्थान योजनेतून २५ लाखांची तरतूदही केली जाणार आहे.
(कोट)
महादरेकडे जाणाऱ्या रस्त्याचे आजवर कधीच रुंदीकरण झाले नाही. हद्दवाढीमुळे रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच रुंदीकरणाचे काम सुरू होईल. दोन किलोमीटरच्या रस्त्यावर पथदिवे देखील बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दशकांचा अंधारही आता दूर होईल.
- वसंत लेवे, नगरसेवक
(कोट)
दरे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दवाढीमुळे बरखास्त झाली. ग्रामपंचायती अंतर्गत येणारा महादरे परिसर पालिकेशी जोडला गेल्याने या भागाच्या विकासाला आता गती मिळाली आहे. पथदिवे, रस्ता ही मूलभूत कामे मार्गी लागणार असल्याचे समाधान आहे.
- रवी पाटेकर, माजी सरपंच, दरे बुुद्रुक
(चौकट)
ग्रामस्थांच्या या आहेत अपेक्षा
- जीवन प्राधिकरण ऐवजी कासचं पाणी मिळावं
- अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे
- अंगणवाडीसाठी दोन स्वतंत्र इमारतींची गरज
- जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे
- मुलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा
- खुल्या जागी व्यापारी संकुल उभारल्यास रोजगाराला चालना
- नगरपालिकेचे एक विभागीय कार्यालय सुरू व्हावं
लोगो : हद्दवाढीची वर्षपूर्ती : भाग १