मायणी ग्रामपंचायतीकडून महापारेषणचे वीज उपकेंद्र सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:22+5:302021-06-30T04:25:22+5:30
मायणी : मायणी ग्रामपंचायतीची दोन वर्षांचा सुमारे साडेतेरा लाख रुपये कर न भरल्याने ग्रामपंचायतीने येथील महापारेषणचे वीज उपकेंद्र मंगळवारी ...
मायणी : मायणी ग्रामपंचायतीची दोन वर्षांचा सुमारे साडेतेरा लाख रुपये कर न भरल्याने ग्रामपंचायतीने येथील महापारेषणचे वीज उपकेंद्र मंगळवारी सील केले. वीज उपकेंद्र सील केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मायणीसह पुसेसावळी, कातरखटाव परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.
याबाबत घटनास्थळ व ग्रामपंचायतीकडून मिळालेली माहिती अशी की, येथील वडूज रोड लगत ११०/३२/२२ केव्ही महापारेषणचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्राच्या जागेचा ग्रामपंचायत कर दोन वर्षांचा सुमारे १३ लाख ४५ हजार रुपये इतका आहे. हा कर मागणीसाठी ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी संबंधित विभागाच्या कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीही हा कर भरण्यात संबंधित विभाग टाळाटाळ करत असल्याने मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास मायणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महापारेषणचे मुख्य गेट व कार्यालय सील केले.
कार्यालय व मुख्यगेट सील केल्यानंतर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तेथून निघून गेल्यानंतर काही वेळातच या वीज उपकेंद्रात तांत्रिक घोटाळा झाला. या तांत्रिक बिघाडामुळे या उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येत असलेल्या कातरखटाव व पुसेसावळी फिडरही बंद झाले. त्यामुळे कातरखटाव, पुसेसावळीसह मायणी परिसरातील विविध लहान मोठ्या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला.
चौकट
या उपकेंद्राच्या करपट्टी १९८१ पासून थकलेले आहे; मात्र आम्ही मागितलेली सुमारे १३ लाख ४५ हजार रुपये ही करपट्टी फक्त दोन वर्षांची आहे. सुरुवातीपासूनची जर करपट्टी मागितली तर ती कोट्यवधी रुपयांवर जाते; मात्र आम्ही फक्त दोनच वर्षांची करपट्टी भरण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून विनंती केली आहे. तरीही संबंधित विभागाने कर पट्टी न भरल्यामुळे आम्ही हे वीज उपकेंद्र व कार्यालय सील केले आहे.
- सचिन गुदगे,
सरपंच मायणी
चौकट
करपट्टी भरण्यासाठी मायणी ग्रामपंचायतीने वीज कंपनीचे मुख्य गेट व कार्यालय सील केले. त्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने या उपकेंद्रातून वीज पुरवठा होत असलेल्या मायणी, कातरखटाव, पुसेसावळी गावठाण फिडर बंद झाले; मात्र मेन गेट बंद असल्याने परिसरात कार्यरत असलेले वायरमन, लाइनमन यांना उपकेंद्रात जाता येत नसल्याने उपकेंद्रातील बिघाड दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा चार वाजल्यापासून खंडित झाला होता.
फोटो
२९मायणी
मायणी ग्रामपंचायतीचा वार्षिक कर न भरल्याने महापारेषणचे वीज उपकेंद्राच्या मुख्य गेट व कार्यालय ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सील केले. (छाया : संदीप कुंभार)