महाराज तर शिवेंद्रराजे; अन् मी जनतेचा सेवक !

By admin | Published: December 22, 2016 11:19 PM2016-12-22T23:19:22+5:302016-12-22T23:19:22+5:30

उदयनराजेंचा टोला : माधवी कदम यांनी घेतला नगराध्यक्षपदाचा पदभार

Maharaj Shivendra Raje; And I am a servant of the people! | महाराज तर शिवेंद्रराजे; अन् मी जनतेचा सेवक !

महाराज तर शिवेंद्रराजे; अन् मी जनतेचा सेवक !

Next

सातारा : ‘मी पण महाराज आहे,’ असं शिवेंद्रराजे वारंवार सांगत फिरत आहेत, आता मीच सांगतो ते महाराज आहेत, मी मात्र जनतेचा सेवक आहे,’ अशी उपरोधिक टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी सातारा पालिकेत केली.
साताऱ्याच्या नूतन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या सभेत उदयनराजे बोलत होते. राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अ‍ॅड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी शंकर गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे यांनी शेलक्या शब्दात विरोधकांचा समाचार घेतला. ‘मी दादागिरी करतो, असा आरोप माझ्यावर करणाऱ्यांनी ते काय करतात हे आधी पाहावे. त्यांचे नाव घेऊन मी त्यांना मोठे करणार नाही. मी दहशतवाद, दादागिरी केली असती तर साताऱ्यात सर्वसामान्य घरातील स्त्री नगराध्यक्ष झाली नसती. सातारा शहरात आर्थिक दहशतवाद कोणी माजवला? दहशतीचे वातावरण कोणी निर्माण केले? हे संबंधितांनी बोलण्याआधी लक्षात घ्यावे.
निवडणूक म्हटल्यावर हार-जीत ठरलेली असते; पण मला कळत नाही विरोधकांना लोक का मतदान करत असतील? काम न करणाऱ्या तसेच स्वार्थापोटी लोकांचा वापर करणाऱ्या उमेदवारांनाही मते दिली जातात. माझ्यासाठी सातारा विकास आघाडीकडून उभे राहिलेले सर्व उमेदवार सारखेच आहेत. आपले २२ नगरसेवक असले तरी ४० प्रभागांची जबाबदारी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यावर आहे. जे उमेदवार पराभूत झाले, त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. ४० उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील कामांची यादी माझ्यासह नगराध्यक्ष, तसेच मुख्याधिकारी यांच्याकडे द्यावी, ती कामे निश्चित मार्गी लावू. आम्ही कारभार करताना हा नगरविकास आघाडीचा तो भाजपचा असा मतभेद करणार नाही. विरोधकांच्याही सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे.
दरम्यान, पाच वर्षांचा कालावधी मोठा आहे. यात आपल्याला अनेक कामे मार्गी लावावी लागणार आहेत. नाक्यावरचा उड्डाणपूल, कास तलाव उंची वाढविण्याचे काम पहिल्यांदा मार्गी लावायचे आहे. सातारा शहरातील कचरा निर्मूलन यंत्रणा राबविण्याच्या अनुषंगाने पुण्यातील उद्योजक सायरस पुनावाला यांच्याशी दमयंतीराजे यांची प्राथमिक चर्चा केली आहे. वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून साताऱ्याला २० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. वाटेल त्या परिस्थितीत आम्ही सातारकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करू.’
राजमाता कल्पनाराजे आणि खासदार उदयनराजे यांनी सुंदर सातारा शहराचे स्वप्न सत्यात उतरवू, असे सांगून नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, ‘नगराध्यक्षपदासाठी सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझ्या विजयासाठी सर्वांनी दिवस-रात्र एक केले. आम्ही असे काम करून दाखवू की दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना सातारा शहरात लक्ष घालण्याची गरज पडणार नाही.’ (प्रतिनिधी)
हवा खायला नाही
कामे करायला जातो...
‘मी सहा-सहा महिने हवा खायला साताऱ्याबाहेर असतो, असा आरोप केला गेला. माझी राजकीय सुरुवात नगरसेवक म्हणून झाली. सातारा पालिकेत आमच्या आघाडीचे पाच ते सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर आमदार झालो. कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष झालो. तेव्हा कास बंदिस्त पाईपलाईनचा विषय मार्गी लावला. मंत्री होतो... त्यानंतर संत्रीही झालो. राजकारणात चढउतार चालत असतात. आम्ही कामे करण्यासाठी साताऱ्याबाहेर असतो, हवा पालटासाठी नाही,’ असे उदयनराजेंनी यानिमित्ताने सूचित केले.
पराभूत उमेदवारांना
सामावून घेऊ...
‘माझ्या शब्दाखातर ज्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला तसेच आघाडीतून निवडणूक लढवून जे पराभूत झाले. त्यांना कुठे ना कुठे संधी दिली जाणार असल्याचे उदयनराजेंनी स्पष्ट केले. पालिकेचे कामकाज कसे करायचे असते, याचा आदर्श पायंडा आम्ही घालून देऊ. असे काम करा की सातारा आघाडी व्यतिरिक्त विरोधातील पॅनेलला पुढील निवडणुकीत लोक पूर्णपणे घरचा रस्ता दाखवतील,’ असे आवाहनही उदयनराजेंनी केले.

Web Title: Maharaj Shivendra Raje; And I am a servant of the people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.