महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वरात रिमझिम पावसाची हजेरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:48 PM2017-10-27T15:48:02+5:302017-10-27T15:58:15+5:30
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिक सुखावले आहेत.
महाबळेश्वर , दि. २७ : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिक सुखावले आहेत.
महाबळेश्वर तालुका हा अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. पंधरा दिवसांपासून धुके व ढगाळ वातावरण असे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे दिवाळी सुटीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी येथील आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला.
आकाशात शुक्रवारी सकाळपासून काळे ढग दाटून आले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या या पावसामुळे पर्यटक व स्थानिक नागरिक सुखावले असून, हवेतील गारव्याचे प्रमाणही वाढले आहे.
कास परिसरातही हजेरी
सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या कास, कासाणी, तांबी या परिसरात शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास हलक्या सरी बरसल्या. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कास व परिसरात पाऊस झाला.