कांटे की टक्कर! माजी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, दोन माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

By नितीन काळेल | Published: October 31, 2024 07:37 PM2024-10-31T19:37:27+5:302024-10-31T19:38:28+5:30

पाटण, काेरेगाव, कऱ्हाड दक्षिण अन् उत्तर मतदारसंघ हाॅट स्पाॅट

Maharashtra Assembly Election 2024 - Big fight in 4 constituencies of Satara district, Karad North, Karad South, Patan, Koregoan | कांटे की टक्कर! माजी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, दोन माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

कांटे की टक्कर! माजी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, दोन माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात निकराची लढत होत आहे. पण, पाटण, कोरेगाव, कऱ्हाड दक्षिण आणि उत्तर हे चार मतदारसंघ हाॅट स्पाॅट ठरले असून कांटे की टक्कर आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि दोन माजी मंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाले असून माघारची प्रक्रिया सुरू आहे. ४ नोव्हेंबरलाच अंतिम लढती स्पष्ट होणार आहेत. तरीही जिल्ह्यातील आठही मतदारसंघात चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतच हा संघर्ष राहील. त्यामुळे दोन्हीही आघाड्यांनी विजयाची पताका फडकविण्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे. तरीही पाटण, कोरेगाव, कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर मतदारसंघ निवडणूक काळात संवेदनशील राहणार आहेत. कारण, मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सलग तिसऱ्यांदा काँग्रेसकडून रिंगणात आहेत. मागील दोन वेळा त्यांनी विजय मिळवला. आताही त्यांच्याविरोधात भाजपचे डाॅ. अतुल भोसले आहेत. येथेही निकराचा सामना रंगणार आहे. पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई सलग तिसऱ्या विजयासाठी शिंदेसेनेकडून मैदानात आहेत. विरोधात उद्धवसेनेचे उमेदवार हर्षद कदम आहेत. पण, त्यांचा सामना महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्याशीच होईल. त्यामुळे पुन्हा देसाई आणि पाटणकर गट समोरासमोर येईल.

कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी सलग चाैथ्यांदा दंड थोपटलेत. विरोधात शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत. मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी शशिकांत शिंदे यांचे प्रयत्न राहतील. त्यातच प्रचाराला जाहीर सुरुवात होण्यापूर्वीच दोघांत राजकीय धुळवडीला सुरुवातही झाली आहे. त्यामुळे कोरेगावची निवडणूक वेगळ्या वळणावर जाण्याची चिन्हे आहेत. दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
 

कऱ्हाड उत्तरचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान

कऱ्हाड उत्तर मतदारसंघ राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. आघाडीतील राष्ट्रवादीकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील रिंगणात आहेत. विरोधात भाजपने मनोज घोरपडे यांना उतरवले आहे. याठिकाणी घाेरपडे यांच्या पाठीशी कोण-कोण ठामपणे उभे राहणार, यावर लढत अवलंबून आहे. पण, यावेळी मतदारसंघात तिरंगी सामना नसल्याने ‘काॅंटे की टक्कर’ होण्याचे संकेत आहेत. पाटील यांच्यासमोर गड राखण्याचे आव्हान असेल.

२०१९ मधील निकाल असा...

कऱ्हाड उत्तर बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी १,००,५०९
विरोधी मनोज घोरपडे अपक्ष ५१,२९४

कऱ्हाड दक्षिण पृश्वीराज चव्हाण काॅंग्रेस ९२,२९६
विरोधी अतुल भोसले भाजप ८३,१६६

पाटण शंभूराज देसाई शिवसेना १,०६,२६६
विरोधी सत्यजितसिंह पाटणकर राष्ट्रवादी ९२,०९१

कोरेगाव महेश शिंदे शिवसेना १,०१,४८७
विरोधी शशिकांत शिंदे राष्ट्रवादी ९५,२५५

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Big fight in 4 constituencies of Satara district, Karad North, Karad South, Patan, Koregoan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.