महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीतून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी
By नितीन काळेल | Published: October 24, 2024 08:34 PM2024-10-24T20:34:50+5:302024-10-24T20:35:42+5:30
पहिली यादी जाहीर : कोरेगावात दोन शिंदेंमध्येच सामना; कऱ्हाड उत्तरवरही शिक्कामोर्तब
सातारा : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली असून कोरेगावमधून आमदार शशिकांत शिंदे यांना तर कऱ्हाड उत्तर मतदारसंघासाठी बाळासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोरेगावमध्ये आता दोन शिंदेंमध्येच निकराचा सामना होणार हे स्पष्ट झालेले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटपाचं सूत्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. तरीही उध्दवसेनेने बुधवारी ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरूवारी सायंकाळी ४५ उमेदवार जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. कोरेगाव मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. शशिकांत शिंदे हे कोरेगावमधून सलग चाैश्यांदा रिंगणात असणार आहेत. तर विरोधात शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत. मागील निवडणुकीत महेश शिंदे यांच्याकडून शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा दोघे समोरासमोर येणार आहेत.
कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादीने पुन्हा आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. याठिकाणी महायुतीतून कोण उतरणार हे स्पष्ट नाही. भाजप तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट हा मतदारसंघ मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. वादातील मतदारसंघ कोणाकडे जातो यावरच या मतदारसंघातील लढत ठरणार आहे.
काॅंग्रेसच्या यादीत कऱ्हाड दक्षिणचे नाव जाहीर होणार...
महाविकास आघाडीतील उध्दवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. आता काॅंग्रेसची यादी येणे बाकी आहे. काॅंग्रेसच्या पहिल्या यादीतच कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव जाहीर होईल असे सांगण्यात येत आहे. तर आतापर्यंत महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील तीन उमेदवार जाहीर झालेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आणि उध्दवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.