Vidhan Sabha Election 2024: साताऱ्याच्या बालेकिल्ल्यावर महायुतीचे निशाण, कऱ्हाडचे दोन्ही तट ढासळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 03:47 PM2024-11-24T15:47:06+5:302024-11-24T15:47:57+5:30
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा किल्ला भाजपने पूर्णपणे काबीज केला
सातारा : लाडक्या बहिणींची माया महायुतीला मिळाल्याचा फायदा राज्यासह सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांनाही मिळाला. सातारा, माण, वाई, पाटण, काेरेगावच्या जागांवरील वर्चस्व राखण्याबरोबरच महाआघाडीच्या कऱ्हाड उत्तर, दक्षिण आणि फलटणच्या गडांना ही खिंडार पडले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा किल्ला भाजपने पूर्णपणे काबीज केला आहे. सर्व आठही जागांवर मोठ्या फरकाने महायुतीने विजय मिळवला आहे.
सातारा विधानसभा निवडणुकीला महायुतीतून भाजपने कऱ्हाड उत्तर, दक्षिण, सातारा आणि माण मतदारसंघातून उमेदवार दिले, तर पाटण, कोरेगावची जागा शिंदेसेनेने लढवली. वाई आणि फलटणची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली.
कऱ्हाड उत्तरमध्ये प्रथमच भाजपचा विजय झाला आहे. याठिकाणी मनोज घोरपडे यांनी १,३४,६२६ मते मिळवली, तर बाळासाहेब पाटील यांना ९०,९३५ मते मिळाली. घोरपडे यांनी ४३,६९१ मतांनी विजय मिळवत बाळासाहेबांची कऱ्हाड उत्तर मधील पाटीलकी संपुष्टात आणली. कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ३९,३५५ मतांनी पराभव करत विजय मिळवला. अतुल भोसले यांना १,३९,५०५ मते, तर पृथ्वीराज चव्हाण यांना १,००,१५० मते मिळाली.
माण मतदारसंघात भाजपच्या जयकुमार भगवान गोरे यांना १,५०,०२१ मते मिळाली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रभाकर घार्गे यांना १,००,३४६ मते मिळाली. जयकुमार गोरे यांनी ४९,६७५ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. साताऱ्यात भाजपच्या शिवेंद्रराजेंनी तब्बल १ लाख ४२ हजार १२४ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. साताऱ्यात शिवेंद्रराजेंना १,६७,८४९, तर अमित कदम यांना ३४,७२५ मते मिळाली. शिवेंद्रराजे भोसले यांचा १,४२,१२४ मतांनी विजय झाला.
फलटणला राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांना १,१९,२८७ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दीपक चव्हाण यांना १,०२,२४१ मते मिळाली. सचिन पाटील यांनी १७ हजार ४६ मतांनी विजय मिळवला. वाईमध्ये राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांनी ६१,३९२ मताधिक्याने विजय मिळविला. त्यांना १,४०,९७१, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांना ७९,५७९ मते मिळाली.
शिंदेसेनेच्या दोन्ही जागांवर वर्चस्व अबाधित
कोरेगाव मतदारसंघात महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट ४५ हजार ६३ मतांनी पराभव केला. महेश शिंदे यांना १ लाख ४६ हजार १६६ मते मिळाली, तर आमदार शशिकांत शिंदे यांना १ लाख १ हजार १०३ मते मिळाली. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांनी ३४,८२४ मताधिक्याने विजय मिळवला. देसाई यांना १,२५,७५९, तर अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर यांना ९०,९३५, तर उद्धवसेनेच्या हर्षद कदम यांना ९,६२६ मते मिळाली.