बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवार मैदानात; दोन दिवस सातारा जिल्ह्यात
By नितीन काळेल | Published: November 13, 2024 08:02 PM2024-11-13T20:02:06+5:302024-11-13T20:03:57+5:30
शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी : आघाडीमुळे पाचच जागांवर लढण्याची वेळ
नितीन काळेल
सातारा : विधानसभा निवडणुकीमुळे सभांचा जोर वाढत चालला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी करणार आहेत. यामध्ये एक दिवस मुक्काम असून, दोन दिवसांत तब्बल पाच सभा घेणार आहेत. यातून बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठी राजकीय खेळ्या होणार आहेत. तर राष्ट्रवादीवर आघाडीमुळे पाचच जागा लढविण्याची वेळ आली आहे.
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला. पण, १९९५मध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जावळी मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला, तर १९९९ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळेपासून जिल्ह्याने शरद पवार यांचीच पाठराखण केली. त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. पण, २०१९पासून बालेकिल्ल्याला भगदाड पडत गेले. आता राष्ट्रवादी आणि भाजपतच कोण वरचढ होणार याचीच स्पर्धा आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माण, फलटण, वाई, कऱ्हाड उत्तर आणि कोरेगाव हे पाच मतदारसंघ लढवत आहे. मागील वेळी सहा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार होते, तर एका ठिकाणी अपक्षाला पाठिंबा होता. यावेळी महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला जागा कमी आल्या. त्यातच राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्याने शरद पवार यांना सातारा जिल्ह्यात विशेष लक्ष द्यावे लागत आहे. यासाठी जिल्ह्यात दोन दिवस येत आहेत.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला पूर्ण तयारी करावी लागत आहे. कारण, यावेळची निवडणूक शरद पवार गटासाठी आव्हान आहे. सर्वच मतदारसंघात काँटे की टक्कर आहे. यामुळे शरद पवार यांनाही विशेष लक्ष द्यावे लागत आहे. त्याची रणनिती ठरविण्यासाठीच दोन दिवसांचा वेळ जिल्ह्यासाठी दिल्याची चर्चा आहे.
पाच मतदारसंघात राजकीय ‘खेळी’ होणार !
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून शरद पवार साताऱ्यात आले नाहीत. शेवटच्या टप्प्यातच त्यांनी साताऱ्यावर स्वारी करण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या सभांचे नियोजन झालेले आहे. यातून बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठीच त्यांची ही रणनिती असल्याचा अंदाज आहे. यासाठी ते १५ नोव्हेंबरला सातारा मुक्कामी आहेत. यावेळी कऱ्हाड उत्तर मतदारसंघात रहिमतपूरला सभा होईल. तसेच १६ नोव्हेंबरलाही ते वाई, कोरेगाव, दहिवडी आणि फलटण येथे चार सभा घेणार आहेत.