आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 05:13 PM2024-10-23T17:13:22+5:302024-10-23T17:22:45+5:30
Koregaon Assembly Elections 2024 : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध शिंदे अशी लढत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार महेश शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे पुन्हा एकदा रिंगणात असतील हे जवळपास स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेंनी भाजपच्या उदयनराजे भोसले यांना जोरदार टक्कर दिली होती. उदयनराजेंना १०३९२२ तर शशिकांत शिंदेंना ९७०८७ मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे या दोन शिंदेंमध्ये चुरशीची लढत होईल यात शंका नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शशिकांत शिंदेंचा पराभव केला. मात्र, त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. राज्याचे राजकीय चित्र बदलले... महेश शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले... दुसरीकडे राष्ट्रवादीने शशिकांत शिंदेंना विधानपरिषदेवर घेतले. त्यामुळे आमदार विरुद्ध आमदार या लढतीत कोण बाजी मारते हे पाहण्याजोगे असेल.
साताऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेला कोरेगावचा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील काही गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. तालुक्यातील काही ठराविक मोठी गावे निवडणुकीवर लक्षणीय प्रभाव टाकतात. २००९ आणि २०१४ अशी सलग दोन टर्म आमदार झालेल्या शशिकांत शिंदेंना २०१९ मध्ये पराभव पत्करावा लागला. मात्र, तेव्हा समीकरण वेगळे होते. आताच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना तसेच काँग्रेसची आघाडी आहे. पण, मागील मोठ्या कालावधीपासून मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रभाव राहिलाय. शरद पवारांचे विश्वासू निष्ठावंत म्हणून शशिकांत शिंदेंची ओळख आहे. तर महेश शिंदेंनी मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. युतीतून कोरेगावची जागा शिवसेनेला सुटल्याने महेश शिंदे भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत आले अन् पुढे विधानसभेवर निवडून गेले. आता ते दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा त्यांचे प्रतिस्पर्धी शशिकांत शिंदेंचे आव्हान असेल.
तसे पाहिल्यास दोन्हीही नेत्यांचा मतदारसंघात असलेला जनाधार पाहता 'काटे की टक्कर' अटळ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात २०१९ मध्ये इतिहास घडला अन् प्रथमच शिवसेनेचा शिलेदार निवडून आला. कोरेगाव शहर, एकंबे, एकसळ, चिमणगाव, ल्हासुर्णे, कुमठे आणि भाडळे अशा काही मोठ्या गावातील मतदारांचा कल निवडणुकीचा निकाल ठरवण्यात मोलाची भूमिका बजावत आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नाही. परंतु, कोरेगावची जागा परंपरेप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असेल आणि शशिकांत शिंदे हेच शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार असतील हे निश्चित आहे.