जनतेच्या भावनांशी खेळणे म्हणजे मोठी गद्दारी, उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका

By दीपक देशमुख | Published: November 20, 2024 12:02 PM2024-11-20T12:02:57+5:302024-11-20T12:05:35+5:30

''युगेंद्र पवार परदेशात राहतात, त्यांना बळीचा बकरा केला''

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Udayanraje Bhosale criticizes MP Sharad Pawar on development work | जनतेच्या भावनांशी खेळणे म्हणजे मोठी गद्दारी, उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका

जनतेच्या भावनांशी खेळणे म्हणजे मोठी गद्दारी, उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका

सातारा : वाई येथे गद्दारांना पाडा, असे खासदार शरद पवार म्हणाले होते. परंतु, सत्ता असल्यापासून गेली साठ वर्षे केवळ त्यांनी व काँग्रेसने घोषणाच केल्या. लोकांची कामे केलीच नाहीत. लोकांच्या भावनांशी खेळले, याच्यापेक्षा मोठी गद्दारी होवू शकत नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केली.

सातारा येथे अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रांवर खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले, विनोद तावडे यांचे चारित्रहनन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. एखाद्या रूममध्ये बसले असताना पैशाची बॅग ठेवून फोटो काढायचे, हे सगळे नियोजित आहे. राजकारणात अनेक वर्षांपासून असले प्रकार सुरूच आहेत.

लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा, असे विचार मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते. त्यांनी लोकशाहीचा पाया रचण्याचे काम केले. त्यांना अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी राज्य झाले पाहिजे. परंतु, स्वातंत्र्यानंतरच्या काळात सत्ताधारी काँग्रेसने फक्त अनेक घोषणा केल्या. घोषणा फक्त मते मिळवण्यासाठीच होत्या. त्यांच्या ६० वर्षाच्या काळात कोणतीही कामे झाली नाहीत की चांगली धोरणे राबवली गेली नाहीत.

परंतु, लोकांना प्रगतीच्या मार्गाने जायचे आहे. हाताचा पंजा सत्ता असताना काही करू शकला नाही. तुतारीने केवळ पोकळ घोषणांचा गाजावाजा केला जात आहे. मशालवाल्यांना तर त्यांनी काय काम केलंय ते मशाल घेवून शोधावे लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

युगेंद्र पवार परदेशात राहतात

बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार उभे आहेत. युगेंद्र पवार यांनी आयुष्य परदेशात काढले आहे. त्यांनी तसंच रहावं. ज्यावेळी काम करायचे होते त्यावेळी केले नाही. आता निवडणुकीच्या काळात हौशे नवशे गवशे असतात. त्यांना बळीचा बकरा केला असल्याचेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Udayanraje Bhosale criticizes MP Sharad Pawar on development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.