विधानसभेसाठी सातारा जिल्ह्यात दाखल २७९ अर्जांपैकी १९८ अर्ज वैध, माघारीकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 03:35 PM2024-10-31T15:35:32+5:302024-10-31T15:35:45+5:30
नावात साधर्म्य असलेल्या अर्जावर आक्षेप
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून २१५ उमेदवारांची २७९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. बुधवारी या अर्जांची प्रशासकीय छाननी झाली. यामध्ये १९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले; तर ८१ अर्ज अवैध ठरले. अर्जमाघारीची मुदत नोव्हेंबरपर्यंत असून त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी ३२ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले होते. छाननीत २७ अर्ज वैध ठरले तर ५ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.
पाटण विधानसभा मतदारसंघासाठी दाखल अर्जांच्या छाननीत स्मितादेवी देसाई यांच्यासह अन्य तीन अपक्ष उमेदवार असे चार उमेदवारी अर्ज अवैध ठरले. २२ पैकी १८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
फलटण मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले; तर २६ जणांचे अर्ज वैध ठरले. प्रमुख तीन उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जांवर हरकती घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात तब्बल तीन तास सुनावणी सुरू होती. अखेर तिन्ही प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
कऱ्हाड उत्तरमध्ये २८ उमेदवारांकडून दाखल झालेल्या ३१ नामनिर्देशन पत्रांपैकी २७ नामनिर्देशनपत्रे वैध ठरविण्यात आली; तर एक अवैध ठरवण्यात आले आहे.
कऱ्हाड दक्षिणेतून २२ उमेदवारांकडून दाखल २८ नामनिर्देशन पत्रांपैकी दोन अपक्षांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरविण्यात आली आहेत, तर २० अर्ज वैध ठरले.
सातारा मतदारसंघात एकूण १९ जणांचे २७ अर्ज दाखल झाले होते. यांपैकी ३ अर्ज छाननीत बाद झाले तर १८ अर्ज वैध ठरले. १ ठिकाणी अर्ज माघारी घेण्यात आला.
माण विधानसभा मतदारसंघातील ३ उमेदवारांचे ५ उमेदवारी अर्ज आज छाननीमध्ये बाद झाले. सोनिया जयकुमार गोरे यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला. आमदार जयकुमार गोरे यांचा मुख्य अर्ज वैध झाल्यामुळे सोनिया गोरे यांचा अर्ज छाननीत बाद झाला. एकूण ३३ अर्ज वैध ठरले.
वाई मतदारसंघासाठी एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत सर्व २८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
नावात साधर्म्य असलेल्या तिघांच्या अर्जावर आक्षेप
अन्य नामसाधर्म्य असलेल्या तीन उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले होते. वकिलांनी त्यासाठी जोरदार युक्तिवाददेखील केला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सर्व आक्षेप फेटाळत तिन्ही अर्ज वैध ठरविले. सुमारे तीन तास ही प्रक्रिया चालली होती.