कऱ्हाडची जनता भूलथापांना बळी पडणार नाही! - सचिन पायलट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 06:51 PM2024-11-18T18:51:01+5:302024-11-18T18:53:44+5:30
कऱ्हाडात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराची सांगता सभा
कऱ्हाड : ‘भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाकडून जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत ते साम, दाम आणि दंड याचा वापर करीत आहेत. कऱ्हाडातही मतदारांना भुलविण्याचे काम सुरू आहे. मात्र, कऱ्हाडची जनता सुज्ञ असून, विरोधी उमेदवाराच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाच येथील मतदार साथ देतील,’ असा विश्वास राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला.
कऱ्हाडच्या शिवतीर्थ चौकात महाविकास आघाडीचे कऱ्हाड दक्षिणचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी कर्नाटकचे माजी खासदार विनयकुमार सोरके, छत्तीसगडचे श्री नाटा, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवार, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, सुरेश जाधव, शारदा जाधव, भानुदास माळी, शिवराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार सचिन पायलट म्हणाले, ‘राज्यात सध्या भाजप आणि युतीचा मुख्यमंत्री आहे. मात्र, भाजपचा एकही नेता एकनाथ शिंदेच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री राहतील, असे बोलत नाही. त्यांच्यात पदासाठी संघर्ष सुरू आहे. पैसा आणि पदासाठी ते लढत आहेत. जनतेने ज्या-ज्यावेळी संधी दिली त्या-त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ विकास साधला. पृथ्वीराज चव्हाण केंद्रात आणि राज्यात मंत्री होते. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी राज्याचा कारभार पाहिला आहे. त्यांच्यावर आजपर्यंत कसलाच आरोप झालेला नाही. स्वच्छ चारित्र्य असलेला हा नेता या भागाला लाभला असून, या नेत्याला विधानसभा निवडणुकीत येथील मतदार निश्चित साथ देतील,’ असा विश्वासही सचिन पायलट यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
आमदार बाळासाहेब पाटील, ‘लोकसभेनंतर यांनी राज्यात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेवर महाविकास आघाडीतील कोणीही काहीही बोलले नाही. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ही योजना बंद होईल, असा अपप्रचार यांनी केला. याउलट आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेतून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचे वचन दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. दिवंगत आनंदराव चव्हाण आणि प्रेमलाकाकी यांचा विचारांचा वारसा त्यांनी जपला आहे. त्यांच्या या विचाराला येथील जनतेने साथ द्यावी.’
जनतेनेच या सरकारला ‘नापास’ ठरवले!
यावेळची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरणारी निवडणूक आहे. गत दहा वर्षे भाजपने महाराष्ट्रावर राज्य केले. मध्यंतरी अनेक स्थित्यंतरे झाली. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात एवढा घोडेबाजार कोणी पाहिला नव्हता जेवढा मोठा घोडेबाजार राज्यात झाला. त्यामुळे हे अवैधानिक आणि अवैध सरकार उलथवून टाकणे गरजेचे आहे. या सरकारवर सर्वाेच्च न्यायालयाने काही निर्णय घेणे टाळले आहे. कायदा मोडला का, घटना मोडली का हे अजूनही जनतेला कळालेलं नाही. या सरकारच्या दहा वर्षांच्या प्रगतीपुस्तकावर महाराष्ट्रातील जनतेने ‘नापास’चा शेरा मारला असल्याचा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.