Maharashtra Election 2019: आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट; उदयनराजेंनी केला मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 09:55 PM2019-10-06T21:55:06+5:302019-10-06T21:55:56+5:30
सातारा लोकसभा पोटनिवडणूक २०१९ - ज्यांनी आमच्यासाठी छातीचा कोट केला होता असे विधान काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना छातीचा कोट केला होता की, कोटाची छाती केली हा मोठा प्रश्न आहे
सातारा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. अशातच सातारा लोकसभा पोटनिवडणूकही एकाच वेळी असल्याने सातारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ज्यांनी आमच्यासाठी छातीचा कोट केला होता असे विधान काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना छातीचा कोट केला होता की, कोटाची छाती केली हा मोठा प्रश्न आहे अशा शब्दात उदयनराजेंनी उत्तर दिलं आहे.
यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले की, राजकारण-समाजकारण सोडा परंतु जेव्हा आमचा वाढदिवसाचा सर्वपक्षीय कार्यक्रम असतानाही ज्यांनी कट करुन, आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट, सामान्य जिल्हावासियांनी मात्र जोरदार हाणून पाडला होता. त्यामुळे जिल्हावासियांनी केलेल्या छातीच्या कोटाचे त्यांना निश्चित आश्चर्य वाटणारच असा घणाघात उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
शशिकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेला सविस्तर उत्तर. pic.twitter.com/iCkImIpxLs
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 6, 2019
तसेच छातीचा कोट करणारे, आपले आई-वडिल, जिवाभावाचे मित्र, देशासाठी आपले जवान छातीचा कोट करुन देशभुमी आणि देशवासियांचे रक्षण करीत असतात. आमच्यासाठी आई-वडिलांसह सातारा जिल्हा वासियांनी छातीचा कोट करुनच आजपर्यंत साथ दिली. आश्चर्य व्यक्त करणारे आमदार आमचे मित्र होते व आजही असले तरी गतवर्षीच्या आमच्या राजकारण विरहित व्यक्तिगत वाढदिवसाच्या सर्वपक्षीय कार्यक्रमावेळी संगनमताने दडून बसले नसते असा टोला उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना लगावला आहे.
दरम्यान, छातीचा कोट केला म्हणणाऱ्यांचा आता जनतेकडून कडेलोट होणार असल्याची कुणकुण लागली आहे. त्यांनी कशाचे आश्चर्य वाटले सांगितले परंतु संगनमताने केलेल्या कटकारस्थानांचे आश्चर्य ते सांगायला विसरले असावेत अशा शब्दात उदयनराजेंनी त्यांची खिल्ली उडविली. एकंदर पाहता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राजकारण आता तापू लागलं आहे. काही दिवसांपर्यंत मांडीला मांडी लावून बसणारे नेते एकमेकांचे वाभाडे काढण्यात दंग झाल्याचं चित्र सातारा जिल्ह्यात निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे.