सातारच्या विकासासाठी आम्ही दोघेही कमी पडणार नाही; उदयनराजेंनी दिला शब्द
By दीपक शिंदे | Published: October 23, 2024 10:30 PM2024-10-23T22:30:30+5:302024-10-23T22:32:22+5:30
शेंद्रे येथे महायुतीचा मेळावा, पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता आरक्षण देऊ शकतील, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
सातारा : सातारा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. पण आज काय स्थिती आहे. असे का घडलं याचा विचार केला तर लोकांच्या हितासाठी जो झटतो, त्याच्याच मागे लोक ठाम राहतात. सातारा मतदारसंघाच्या विकासासाठी शिवेंद्रराजे भोसले आणि मी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
शेंद्रे, ता. सातारा येथे सातारा मतदारसंघाचा महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी सभापती सुनील काटकर, ॲड. दत्ता बनकर, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, युवराज कांबळे, समृद्धी जाधव, अमोल माेहिते, सयाजीराव चव्हण, राजेंद्र यादव, कांचन साळुंखे, सुवर्णा पाटील, सरिता इंदलकर, जयेंद्र चव्हाण, बाळासाहेब गोसावी, रंजना रावत, निशांत पाटील, गीतांजली कदम, विकास गोसावी, सुजाता राजेमहाडिक, किशोर शिंदे, स्मिता घोडके आदी उपस्थित होते.
यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, कोण काय म्हणते, हे पाहण्यापेक्षा स्वत:च्या मनाला विचारा. कार्यकर्त्यांनी बेसावध राहू नये, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, आम्ही संविधान बदलणार, आरक्षण काढून घेणार अशी फेक नरेटिव्ह विरोधकांकडून पसरवली जात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी संविधानाला कुणाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका मांडली.
मोदी यांनी केवळ निवडणुकीपुरती कोणतीही योजना सुरू केली नाही. त्यांच्याच आदर्श घेऊन महाराष्टात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. विरेाधकांनी मात्र, योजनेसाठी पैसे नसल्याचा गवगवा सुरू केला आहे. योजनेचे हप्ते जमा होऊ लागताच त्यांचे डोळे उघडले. खासदार शरद पवार यांच्या हातात राज्याची सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता आरक्षण देऊ शकतील, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
उदयनराजेंच्या कोपरखळ्या
आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या दाढीसमोर पुष्पा ही फिका पडेल. तुमचे सगळे जेवणाकडे जाल, अन् मी इथे एकटाच राहीन, मागच्या वेळी काेणी म्हटले होते की आमचं काय.. महत्त्वाकांक्षा असणे वाईट नाही
उद्योगपतीची गोष्ट अन् जागं राहण्याचा इशारा
कार्यकर्त्यांनी अतिआत्मविश्वासात राहू नये, यासाठी शिवेंद्रराजे भोसले यांनी उद्योगपती आणि वॉचनमची गोष्ट सांगितली. अतिआत्मविश्वासामुळे माझी विकेट उडू नये याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.