Maharashtra Election2019 : गड-किल्ल्यांवर बार उघडायच्या विचारापेक्षा मेलेलं बरं- उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 05:44 PM2019-10-16T17:44:02+5:302019-10-16T17:44:36+5:30
गड-किल्ल्यांबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला...
वाई : ‘गड-किल्ल्यांबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, निवडणुका आल्या की चारित्र्यहनन करणं हे आता किळसवाणं झालं आहे. त्याचबरोबर गड-किल्ल्यांवर डान्सबार, बार उघडा असे म्हणण्याचा विचार मनात येण्यापेक्षा मेलेलं बरं,’ असे भावनिक उद्गार माजी खासदार व सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काढले.
वाई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, ‘गड, किल्ले ही छत्रपती शिवरायांची आठवण व पराक्रमाची प्रतीके आहेत. या गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, असे माझे म्हणणे आहे. याबाबत राज्य शासनानेही नियोजन केलंय. गड, किल्ल्याबाबत मी जे वक्तव्य केलेच नाही, त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा काहींकडून प्रयत्न होत आहे. गड, किल्ले पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, लोकांना किल्ल्यावर जाता यावे, राहण्याची व्यवस्था असावी, यासाठी त्याठिकाणी काही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने भूमिका मांडली. या भूमिकेनुसार गड, किल्ल्यांवर निवासाची सोय, पायथ्याशी राहण्याची व्यवस्था असावी. गडावर जाण्यासाठी रोपवे असावा, अशी भूमिका मी मांडली होती. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मी जे बोललो ते बोललो; मात्र मी जे बोललोच नाही, त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे.’
‘चुकीचे खापर माझ्यावर फुटणार असेल तर हे बरोबर नाही. ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी झाल्यास पर्यटनवाढीस चालना मिळून रोजगारनिर्मिती होणार आहे. मी संकुचित बुद्धीचा नसून निवडणूक आली की माझ्या चारित्र्यहननाचा काहीजणांकडून कट शिजवला जातो,’ असा आरोपही उदयनराजेंनी या पत्रकार परिषदेत केला.
----------------------
जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडणार असून, विकासात कुठेही कमी पडणार नाही. विरोधकांनीही जिल्ह्यासाठी काय केले ते सांगावे. निवडणुकीच्या काळात माझ्या चारित्र्यहननाचा काहीजणांकडून कट शिजवला जात आहे.
- उदयनराजे भोसले