Maharashtra Floods : शासनाने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:39 PM2019-08-10T15:39:07+5:302019-08-10T15:46:00+5:30
'अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची घरे गेली आहेत. शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.'
कऱ्हाड - ‘अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची घरे गेली आहेत. शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. आमच्या काळात लातूरमध्ये जेव्हा भूकंप आला होता. तेव्हा अनेक घरे पडली होती. त्याठिकाणी आमच्या सरकारने तेथील कुटुंबीयांना आठ महिन्यांत एक लाख घरे बांधून दिली होती. या सरकारला ते शक्य आहे का? असा सवाल करीत याही सरकारने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी (10 ऑगस्ट) दुपारी बारा वाजता कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर, डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील यांनी कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील पूरस्थितीची माहिती दिली.
Maharashtra: National Disaster Response Force (NDRF) continues rescue operations in Sangli. #maharashtrafloodspic.twitter.com/khJCho9YlB
— ANI (@ANI) August 10, 2019
कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सुरू झालेला विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेला पूर ओसरू लागला असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, तसेच पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लीटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. पूरस्थिती उद्भवल्यानंतर पाचव्या दिवशी सरकारी यंत्रणा जोमाने मदत कार्यास लागली. स्वत: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी पूरस्थळी भेटी देऊन सरकारी यंत्रणा गतिमान केली.
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे शाळा अथवा अन्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेत शासनाने 154 कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
#Maharashtra: Areas in Hasur and Nrusinhwadi, in Kolhapur district inundated due to flood water. pic.twitter.com/yenpptQQYI
— ANI (@ANI) August 10, 2019
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 13 जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 1 हजार 496 हेक्टरवर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, कोल्हापूरआणि सांगलीला सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले असल्यास त्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत बागांची पुनर्उभारणी करण्यासाठी शंभरटक्के अनुदान दिले जाईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. फलोत्पादन मंत्री क्षीरसागर यांनी विभागातील कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयात बैठक बोलावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करणार याची माहिती दिली. कृषी आयुक्त सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते.