महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: उद्या ते मुंबईवरही दावा करतील - पृथ्वीराज चव्हाण
By प्रमोद सुकरे | Published: November 23, 2022 05:54 PM2022-11-23T17:54:56+5:302022-11-23T17:56:08+5:30
गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये मोठी बंडखोरी
कऱ्हाड : राज्याच्या दिशा बदलण्याचा अधिकार केंद्राच्या सभागृहाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सिमाप्रश्नाबाबत न्यायालयात दावे-प्रतिदावे आहेत. त्यामुळे सध्या कोण काय म्हणतय, याला महत्व नाही. महाराष्ट्राच्या सिमा निश्चितीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारा लढा आम्ही ताकदीनिशी लढू, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री व सिमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे सदस्य आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, अशोकराव पाटील, इंद्रजीत गुजर, प्रदीप जाधव, फारुख पटवेकर, इंद्रजीत चव्हाण, नितीन थोरात, अॅड. नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते, झाकीर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कर्नाटक, महाराष्ट्र सिमाप्रश्न उच्चाधिकार समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यात न्यायीक लढाई कशी लढायची, याच्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर सिमाभागातील लोकांच्यावर जो अन्याय चालला आहे, त्याबाबत काय करायचे, याच्यावर चर्चा होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचे ठरले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा सांगत आहेत, याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, उद्या ते मुंबईवरही दावा करतील. मात्र, ही न्यायीक लढाई आहे. महाराष्ट्राने याबाबत २००४ साली सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर त्यावर २०१४ मध्ये कर्नाटकने पुन्हा नवा दावा दाखल केले आहे. कर्नाटकने केलेल्या दाव्यामध्ये सिमाप्रश्नाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्राच्या पार्लमेंटला आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे २०१४ च्या दाव्याचा निकाल लागल्याशिवाय मुळच्या दाव्यावर विचार होऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. मात्र, आमची समिती न्यायालयीन लढाई पुर्ण ताकदीने लढेल.
गुजरात निवडणुकीच्या संदर्भाने बोलताना ते म्हणाले, गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये मोठी बंडखोरी आहे. आप तेथे मोठ्या प्रमाणात उतरला असला तरी तेथे खरी लढत ही काँग्रेस व भाजपमध्येच आहे. भाजपची तेथे सलग २७ वर्ष सत्ता आहे. ती बदलण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
भाजपने खरा शोध घेऊन उत्तरे द्यावीत
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, इतिहास पुरूषांकडे ऐतिहासीक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्या दोन्ही बाजु तपासल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सावरकरांना माफीवीर असे म्हटले. त्यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी पुरावा मागीतल्यावर त्याचा त्यांनी पुरावाही दिला. आता त्यावर नाहक चर्चा न करता भाजपने खरा शोध घेऊन त्याची उत्तरे द्यावीत.
.. अन् बाबांनी कोपरापासून हाथ जोडले!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी कोपरापासून हाथ जोडले. राज्यपाल कोश्यारी हे मुद्दाम वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. त्यांना पुन्हा हिमाचलमध्ये मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी वक्तव्ये केल्यानंतर ते परत पाठवतील, असे त्यांना वाटत असावे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची मुख्यमंत्री करणार उद्घाटने
शुक्रवार, दि. २५ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कºहाडात येत आहेत. त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या विकासकामांमधील नवीन प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण, नविन विश्रामगृहाचे उद्घाटन यासह कृष्णा नदीवरील पाचवडेश्वर ते कोडोली व रेठरे नवीन पुलाचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते आयोजीत केले असल्याची माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली.