सातारा : वारीत महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 01:16 PM2018-07-15T13:16:15+5:302018-07-15T14:18:02+5:30
फलटण तालुक्यात दुर्घटना; टँकरच्या धडकेत महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांंची सून ठार
महाबळेश्वर/ तरडगाव : श्री संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी तरडगाव मुक्कामी असताना शनिवारी मध्यरात्री दर्शन घेऊन परतणा-या महिलेला टँकरने धडक दिली. यात महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांच्या सुश्रुषा कविता विशाल तोष्णीवाल (वय 42 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, वारीत पायी चालणा-या तीन वारक-यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार , संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी शनिवारी (14 जुलै) लोणंद येथील दीड दिवसाचा मुक्काम आटोपून तरडगाव येथे मुक्कामी होती. महाबळेश्वर येथील तोष्णीवाल कुटुंबीय पालखीचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्री 12 वाजता पालखी तळाजवळ जात होते.
कविता तोष्णीवाल लोणंद-फलटण रस्ता ओलांडत असताना त्या दुभाजकावर थांबल्या होत्या. यावेळी लोणंदकडून फलटणकडे जाणा-या टँकर (एमएच १० झेड २७०८) ने जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महाबळेश्वर बंद पाळून नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनला टँकर चालक यशवंत पावले (वय 30 वर्ष) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार दतात्रय दिघे करीत आहेत.
दरम्यान, पालखीचे रविवारी सकाळी तरडगावातून फलटणच्या दिशेने प्रस्थान होत असताना तीन वारक-यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये कलुबा तुळशीराम सोलने (६५, रा. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा), सुभाष चंद्रभान गायकवाड (५५, रा. मुकुंदवाडी, ता. जि. औरंगाबाद) यासह अन्य एकजण अशा तीन वारक-यांचा समावेश आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.