नवा 'महाराष्ट्र केसरी' मिळणार! कोल्हापूर vs मुंबई लढत होणार; गतविजेत्यांना चितपट करत विशाल-पृथ्वीराज अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 12:23 PM2022-04-09T12:23:39+5:302022-04-09T13:03:59+5:30
यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर vs मुंबई लढत होणार आहे. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे.
सातारा : वादळी पावसामुळे काल, शुक्रवारी ६४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आज पुन्हा या लढतींना सुरुवात झाली. मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या या रंगतदार लढतीत गतविजेत्या दिग्गज पैलवानांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरीचा किताब कोण पटकावणार याकडे कुस्तीशौकींनाचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर vs मुंबई लढत होणार आहे. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे. त्यामुळे यंदाचा किताब कोण पटकावणार याकडेच कुस्तीशौकिंनाच्या नजरा लागल्या आहेत.
देवठाणे (ता करवीर) कोल्हापूरच्या व वर्षभरापूर्वी लष्करात दाखल झालेल्या पृथ्वीराज पाटील याने पुण्याच्या हर्षद कोकाटे वर ८-१ अशी गुणांवर मात करीत गादी गटातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीच्या अंतिम फेरीत मजल मारली. माती गटात मूळचा बनकर वाडी सोलापूर येथील आणि सध्या मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेख याच्यावर डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लढतीत मात करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे. पृथ्वीराज व हर्षद यांच्यातील लढतीकडे राज्यभरातील तमाम कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून राहिले होते. दोन्ही तगडे मल्ल असल्याने एकमेकांमध्ये खडाखडी आणि ताकतीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न झाला. एक मिनिट संपला तरी दोन्ही मल्लांना एकही गुण घेता आला नाही. त्यानंतर पृथ्वीराजने एकेरी पटावर दोन गुणांची कमाई केली.
दुसऱ्या फेरीत पृथ्वीराज अत्यंत चपळाईने भारंदाज डावावर सहा गुण मिळवले. त्यानंतर पुढची रजनी एकापाठोपाठ डाक, भारंदाज मारून ६ गुणाची कमाई केली. शेवटचा 30 सेकंड मध्ये पुन्हा अक्षयने पुन्हा लढतीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण तो हाणून पाडला अखेरीस ६ गुणांनी ही लढत जिंकत महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत प्रवेश केला.
पृथ्वीराज पाटील- विशाल बनकर यांच्यात अंतिम लढत
माती विभागात वाशिमचा सिकंदर शेख विरूद्ध मुंबई पूर्वच्या विशाल बनकर यांच्यात काटा-जोड लढत झाली. सिकंदरने चपळाई आणि चिकाटीच्या जोरावर चार गुण मिळविले. त्यानंतर विशालने तितक्याच तितक्याच चपळाईने खेळ करीत गुणांची बरोबरी साधली. या लढतीत दहा-दहा असे समसमान गुण झाले होते.
उत्तरोतर रंगतदार झालेल्या लढतीत सिकंदरने हबकी मारण्याचा प्रयत्न केला. विशालने सिकंदरला रोखले. अखेरीस विशालने कोल्हापुरातील गंगावेस तालमीचा त्याचा सहकारी असलेला सिकंदर शेखचा अनपेक्षित १३ विरूद्ध १० गुण फरकाने पराभव करीत माती विभागातून केसरी किताबासाठी अंतिम लढतीत प्रवेश केला.
सायंकाळी होणार मुकाबला
सायंकाळी त्याचा मुकाबला तुल्यबळ पृथ्वीराज पाटील यांच्याशी होणार आहे याकडे राज्यातील तमाम कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे पृथ्वीराज कोल्हापूरचा आहे. तर विशाल बनकर बनकरवाडी सोलापूरचा आहे. तो या स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहे. गेली आठ ते नऊ वर्षे कोल्हापुरातील गंगावेस तालमीत वस्ताद विश्वास हारुगले यांच्याकडे कुस्तीचे धडे गिरवत आहे.