महाराष्ट्र केसरी: कोल्हापूर, सांगली अन् साताऱ्याचे पहिल्या फेरीत वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 11:49 AM2022-04-06T11:49:15+5:302022-04-06T11:52:49+5:30

एकूण सहा फेऱ्यांमध्ये या स्पर्धा होणार असून, बुधवारी सकाळी या गटांतील लढतींचे निकाल हाती येणार आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी सातारकरांसह महाराष्ट्रातून हजारो कुस्ती शाैकिनांनी उपस्थिती लावली आहे.

Maharashtra Kesari: Kolhapur, Sangli and Satara dominated in the first round | महाराष्ट्र केसरी: कोल्हापूर, सांगली अन् साताऱ्याचे पहिल्या फेरीत वर्चस्व

छाया - दीपक शिंदे

googlenewsNext

सातारा : साताऱ्यात ६४ व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला मंगळवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ५७, ७० आणि ९२ किलो वजनी गटात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांचे वर्चस्व राहिले. एकूण सहा फेऱ्यांमध्ये या स्पर्धा होणार असून, बुधवारी सकाळी या गटांतील लढतींचे निकाल हाती येणार आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी सातारकरांसह महाराष्ट्रातून हजारो कुस्ती शाैकिनांनी उपस्थिती लावली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या फेरीतील मॅट आणि माती प्रकारातील कुस्तीला प्रारंभ झाला. मॅटमधील ५७ किलो गटामध्ये एकूण १३ कुस्त्या झाल्या. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे वर्चस्व राहिले, तर माती गटामध्ये एकूण ७ कुस्त्या पार पडल्या. त्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पैलवानांनी वर्चस्व गाजवले. ७० किलो वजनी गटातील मॅट प्रकारामध्ये एकूण २१ कुस्त्या झाल्या. त्यामध्ये पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांतील पैलवानांनी बाजी मारली, तर माती प्रकारामध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनी वर्चस्व कायम ठेवले.

सर्वात रंगतदार लढती

तसेच सर्वात रंगतदार लढती पाहायल्या मिळाल्या, त्या ९२ किलो गटातील कुस्त्यांमध्ये. ९२ किलो गटामध्ये मॅट या प्रकारात एकूण २० लढती झाल्या. यामध्ये कोल्हापूर, मुंबई, सोलापूर या जिल्ह्यांतील पैलवानांनी रंगतदार लढती केल्या, तर माती या प्रकारामध्ये एकूण १३ लढती झाल्या. यात कोल्हापूर, मुंबई, पुणे जिल्ह्यातील खेळाडूंनी अत्यंत चटकदार कुस्त्या केल्या.

पाच आखाड्यांमध्ये एकाचवेळी लढती

जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पाच आघाडे तयार करण्यात आले आहेत. या आखाड्यांमध्ये एकाचवेळी लढती लावल्या जात आहेत. विशेषत: माती प्रकारातील लढतीला कुस्ती शाैकिनांकडून दाद मिळत आहे. या तिन्ही गटांमध्ये एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. त्यातून अंतिम लढत होणार आहे. रात्री दहापर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहेत. उर्वरित लढती बुधवारी सकाळी सुरू होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Kesari: Kolhapur, Sangli and Satara dominated in the first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.