Maharashtra Kesari: ... जेव्हा स्वप्न सत्यात उतरतं, 'महाराष्ट्र केसरी'ची गदा कवेत घेऊन पृथ्वीराज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 07:39 AM2022-04-11T07:39:14+5:302022-04-11T07:49:45+5:30
कोरोनामुळे 2 वर्षे न झालेल्या आणि यंदा उत्साहात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावला.
सातारा - पैलवानाचं अन् कु्स्तीचं अतूट नातं असंत. या प्रत्येक पैलवानाचं एक स्वप्न असतं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी व्हायचं अन् मानाची गदा जिंकून महाराष्ट्राच्या लाल मातीच्या इतिहासात आपलं नाव कोरायचं. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या रांगड्या पठ्ठ्यानं मानाची गदा पटकावली. तब्बल 21 वर्षानंतर कोल्हापूरला हा मान मिळाला आहे. त्यामुळे, साहजिकच याचा आनंद पृथ्वीराज पाटीलसह कोल्हापूरवासियांना झाला आहे. या आनंदी क्षणाची साक्ष देणारा एक हळवा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कोरोनामुळे 2 वर्षे न झालेल्या आणि यंदा उत्साहात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावला. पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकरला चितपट करत मानाची गदा उंचावली अन् महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला. पृथ्वीराजच्या या विजयामुळे कोल्हापूरकरांचे बऱ्याच वर्षाचं स्वप्न पुर्ण झालं. त्यासोबतच, अवघ्या 20 वर्षांच्या पृथ्वीराजचेही स्वप्न पूर्ण झालं आहे. महाराष्ट्र केसरीची गदा मिळवल्यानतंर ती मानाची गदा घेऊन थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. मान्यवरांच्या भेटीगाठी केल्या जात असतात. त्यामुळे, या चांदीच्या गदेला कुस्तीक्षेत्रात वेगळंच स्थान आहे.
महाराष्ट्र केसरीची गदा ही विजयी पैलवानासाठी आयुष्यभराची पूंजी ठरते. त्यामुळे, या गदेसोबत पैलवानाचं भावनिक नातं जुळतं. पृथ्वीराज पाटीलचा सध्या व्हायरल होत असलेला फोटो याच नात्याची साक्ष देत आहे. त्यामध्ये, घरात जमिनीवर झोपलेला पृथ्वीराज दिसत असून त्याने अलगद ती गदा आपल्या कवेत घेतली आहे. चांदीच्या गदासोबत शांत भावमुद्रेत तो झोपला असून त्याचा हा फोटो कुणीतरी टिपला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अंतिम कुस्तीत 5-4 फरकाने विजयी
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराजनं अखेरच्या 45 सेकंदात विशाल वर डाव टाकत ही किताब पटकावला. त्याने 5-4 अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं. माती व गादी गटाच्या स्पर्धेत अंतिम सामने रंगतदार झाले. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली. अंतिम लढतीची कुस्ती सुरु झाल्यापासून चुरशीची बनली होती.
पृथ्वीराज मूळचा पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा
पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा केला. त्याने वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे गिरवले. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.