पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाकडून 'महाराष्ट्र क्रांती सेना' पक्षाची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 01:46 PM2018-11-08T13:46:29+5:302018-11-08T14:07:42+5:30
मराठा समाजाकडून महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सातारा - मराठा समाजाकडून महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी या पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून सुरेश पाटील यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, मराठा मोर्चानं पक्षाचं नाव मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा असं ठेवण्यास विरोध केला. या नावांमध्ये मराठा समाजाची अस्मिता दडली आहे. त्यामुळे पक्षाचं नाव महाराष्ट्र क्रांती सेना ठेवले, अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली.
(‘मराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर क्रांती मोर्चा होणार आक्रमक’)
मराठा समाजाच्या नेत्यांकडून रायरेश्वर येथे 'महाराष्ट्र क्रांती सेना' पक्षाची स्थापना, मराठा मोर्चा आणि मराठा संघटनां'चा विरोध डावलून सुरेश पाटील यांच्याकडून नव्या पक्षाची स्थापना
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 8, 2018
‘मराठा क्रांती मोर्चा’ नावाने पक्ष स्थापनेला नाशिकमधून विरोध
दरम्यान, पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व तुषार जगताप यांनी सोमवारी स्पष्ट केली होती. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट आरक्षण प्राप्त करणे आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मराठा संघटनांच्या पक्ष स्थापनेशी संबंध नाही. नाशिकसोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचाही पक्ष स्थापनेला विरोध असल्याचे सांगतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने पक्षाची निर्मिती करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समन्वयकांनी सांगितले होते.
गेल्या आठवड्यात नवीन मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा नावाने पक्ष अथवा संघटनांची स्थापना करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, अशा प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी त्यांना कडाडून विरोध करण्याची भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.
कोणीही नेता नाही
मराठा क्रांती मोर्चात कोणीही नेता, मार्गदर्शक, पाठीराखा अथवा रसद पुरविणारा व्यक्ती नाही, हे मोर्चाचे ठळक वैशिष्ट्य आहे.‘ एक मराठा, लाख मराठा’ हे घोषवाक्य घेऊन मराठा समाज आपसातील मतभेद, पक्ष, संघटना विसरून एकवटला होता. ही एकजूट अशीच पुढेही कायम राहावी यासाठी मराठा समाजाचा कोणताही विशिष्ट पक्ष, संघटना अथवा नेता असणार नसल्याचेही नाशिकच्या समन्वयकांनी स्पष्ट केले होते.