महाराष्ट्र पोलीस नागरिकांच्या हिताचे संरक्षणकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:25+5:302021-06-25T04:27:25+5:30

सातारा : महाराष्ट्र पोलीस हे नागरिकांच्या हिताचे, मालमत्तेचे रक्षण करतात. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात पोलीस हे रस्त्यांवर उतरून ...

Maharashtra Police protects the interests of citizens | महाराष्ट्र पोलीस नागरिकांच्या हिताचे संरक्षणकर्ते

महाराष्ट्र पोलीस नागरिकांच्या हिताचे संरक्षणकर्ते

Next

सातारा : महाराष्ट्र पोलीस हे नागरिकांच्या हिताचे, मालमत्तेचे रक्षण करतात. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात पोलीस हे रस्त्यांवर उतरून शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन नागरिकांकडून करून घेतात. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील पोलीस ठाणे व वसाहतीचे ई-भूमिपूजन गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री सतेज पाटील (शहरे), पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस महासंचालक तथा पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा (सर्व ऑनलाइन), पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते.

पोलिसांचा प्रवासाचा वेळ वाचण्यासाठी पोलीस ठाण्याच्या जवळच पोलीस कर्मचाऱ्यांची घरे असणे खूप महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पोलिसांसाठी विभागवार प्रशिक्षण केंद्र असले पाहिजे. अशा प्रशिक्षण केंद्रांमुळे पोलिसांचे शारीरिक क्षमता व मनोबल वाढण्यास चांगली मदत होते. अशा शिक्षणामुळेच आज महाराष्ट्र पोलीस देशात सर्वोत्तम आहेत, ती जगात सर्वोत्तम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोयनानगर येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी होत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचे सादरीकरण करण्यात यावे, असे स्पष्ट करून या केंद्राचे कामही लवकरच सुरू करण्याचे संकेत दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘मल्हारपेठ हे बाजारपेठेचे महत्त्वाचे गाव आहे. येथील लोकसंख्याही वाढली आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी राज्य शासनाने इथे पोलीस ठाणे वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा भर आहे.’

मल्हारपेठ येथे पोलीस ठाणे व्हावे, यासाठी १९९५ पासून प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाने याला मान्यता देऊन पोलीस ठाणे व वसाहतीसाठी निधी उपलब्ध करून दिला. कोयना नगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावालाही मान्यता द्यावी. राज्य शासन पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करीत आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी ७०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे प्रास्ताविकात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

चौकट..

रंग बदलण्याचे धाडस महाविकास आघाडीत - ठाकरे

पोलीस ठाण्याला देण्यात आलेला पिवळा पट्टा अन्‌ निळा पट्टा असा रंग बेकार दिसत असून, तो आपल्याला पसंद नसल्याने तो त्वरित बदलावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मनोगतात म्हणाले. तोच धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सध्या अनेक जण अनेक रंग दाखवत आहेत, पण हे रंग बदलायचे धाडसही दाखवावे लागते. हे रंग बदलण्याचे धाडस केवळ महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे.

चौकट...

५५ वर्षांवरील पोलिसांना फिल्डवर्क नाही

कोरोना संकटाच्या काळात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू व बाधित झालेल्या पोलिसांसाठी ५० लाखाचे संरक्षण तसेच ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना फिल्डवर्क न देता कार्यालयातील काम देण्याचा चांगला निर्णय घेतला. पोलीस मित्र म्हणून समाजात काम करीत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

फोटो नेम : २४मल्हारपेठ

मल्हारपेठ, ता. पाटण येथील पोलीस ठाणे व पोलीस वसाहतीच्या इमारतीच्या ऑनलाइन भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Police protects the interests of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.