फलटणमध्ये विजेचा धक्का लागून 2 वारकऱ्यांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:57 PM2018-07-16T12:57:00+5:302018-07-16T13:03:39+5:30
परभणी येथील मोतीराम महाराज दिंडी क्रमांक 49 मध्ये हे दोन्ही वारकरी चालत होते.
फलटण : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या फलटण येथील पालखीतळावर सोमवारी (16 जुलै) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास विजेचा धक्का लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर एक महिला वारकरी गंभीर जखमी आहे.
जाईबाई माधवराव जामके (60 वर्ष) रा. शिवणी, ता. लोहा, जिल्हा नांदेड आणि ज्ञानोबा माधव चोपडे (65) रा. समतापूर, जि. परभणी अशी मृत वारकऱ्यांची नावे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी सोहळयात सहभागी असलेल्या परभणी येथील मोतीराम महाराज दिंडी क्रमांक 49 मध्ये हे दोन्ही वारकरी चालत होते.
आज पहाटे शौचास जात असताना ही दुर्घटना घडली. या दोघांसह कमल लोखंडे (जि. परभणी) ही महिलादेखील विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाली. तिच्यावर फलटण येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही मृतांचे शवविच्छेदन फलटण येथील रुग्णालयात होणार असून त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात येणार आहे.
पावसामुळे वारकऱ्यांचे हाल
फलटण येथील मुक्कामात सोमवारी पहाटे पावसाला सुरूवात झाली. अगदी प्रस्थानाची तयारी सुरू असताना पाऊस आल्याने वारकऱ्यांची धावपळ झाली. अनेकांचे कपडे ओले झाले. विजेचा धक्का बदल्याचे वृत्त वारकऱ्यांमध्ये पसरताच एकच धावपळ उडाली. वारकऱ्यांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक दत्त मंदिर संस्थान विलास खराडे यांनी बरीच मदत केली.