Vidhan Sabha 2019 : ''गांधी हत्या करणारा नथुराम देशभक्त की देशद्रोही?''
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 04:47 AM2019-09-18T04:47:55+5:302019-09-18T04:48:57+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - लोकशाही पायदळी तुडवून काँग्रेसने आणीबाणी आणली, असे मुख्यमंत्री आम्हाला म्हणतात.
क-हाड : लोकशाही पायदळी तुडवून काँग्रेसने आणीबाणी आणली, असे मुख्यमंत्री आम्हाला म्हणतात. मी ३७० च्या बाजूचा की विरोधातला? असा प्रश्न विचारतात. त्याआधी त्यांनी महात्मा गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशद्रोही होता की देशभक्त? या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे प्रतीआव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. सोमवारी कºहाड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री बेरोजगारी, आर्थिक मंदी, पुरामध्ये आलेले अपयश अशा प्रश्नांना बाजूला ठेवून रोजगार, गुंतवणुकीतील खोटी आकडेवारी सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत.
देश सध्या मोठ्या आर्थिक मंदीत सापडला आहे. अशा अवस्थेत देशात कोणकोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक केली, किती नवे उद्योग आणले, त्यामध्ये किती जणांना रोजगार मिळाला? याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत नाहीत. गुंतवणूक काय आभाळातून होतेय काय? ते जर म्हणत असतील की गुंतवणूक वाढली आहे, तर त्यांनी संपूर्ण जिल्हावार परदेशातून कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली, किती नवीन उद्योग सुरू केले, याची माहिती द्यावी. उगाच उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.
पक्षश्रेष्ठींकडून आदेश नाही
मी क-हाड दक्षिणमधूनच विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अजून काहीच आदेश आला नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.