दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्रपुत्र शहीद, 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं जॉईन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:58 AM2022-05-22T05:58:30+5:302022-05-22T05:59:38+5:30
प्रथमेशच्या घरची स्थिती बेताचीच आहे. वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते
कुडाळ (सातारा) : जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (२२) जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टर भागात सेवा बजावताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाला. रविवारी त्याचे पार्थिव बामणोली तर्फ कुडाळ येथे आणणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
प्रथमेशच्या घरची स्थिती बेताचीच आहे. वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते. कोरोना काळात त्याने जिद्द सोडली नाही. १४ मराठा बटालियनमध्ये जानेवारीत प्रशिक्षण पूर्ण करून, पहिल्यांदाच जम्मू येथे तो रुजू झाला. अविवाहित प्रथमेशच्या पश्चात वडील संजय महादेव पवार, आई राजश्री, लहान भाऊ आदित्य असा परिवार आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमेश यांच्या वीरमरणानंतर श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच, 3 महिन्यांपूर्वीच ते सैन्यात दाखल झाले होते, अशी माहितीही दिली.
सातारा जिल्ह्यातील बामणोली येथील जवान प्रथमेश पवार यांना जम्मू येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. प्रथमेश यांना लष्करी सेवेत दाखल होऊन केवळ तीन महिनेच झाले होते. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानास सलाम. पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) May 21, 2022
पहिलेच पोस्टिंग जम्मूत
प्राथमिक शिक्षण घेत असताना देशसेवेची आवड त्यांना होती. धाडसी आणि करारी असलेले प्रथमेश आपल्या आई-वडिलांवर अत्यंत प्रेम करणारे आणि परिस्थितीची जाणीव असणारे होते. अतिशय कठीण परिस्थितीत कोरोना काळात सुद्धा या ध्येयवेड्या तरुणाने आपली जिद्द सोडली नाही. १४ मराठा बटालियन मध्ये जानेवारी महिन्यात प्रशिक्षण घेवून पहिल्याच पोस्टिंगवर जम्मू येथे देशसेवा करण्यासाठी ते रुजू झाले होते.
कुटुंबांचा एकमेव आधार
शहीद प्रथमेश हे कुटुंबांचा एकमेव आधार होते. यामुळे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़. सैन्य दलात दाखल झालेले प्रथमेश अविवाहित होते. त्यांच्या पश्चात वडील संजय महादेव पवार, आई राजश्री,, लहान भाऊ आदित्य असा परिवार आहे.