देशातील लोकप्रिय पन्नास अधिकाऱ्यांत महाराष्ट्राचे तिघे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:16+5:302021-03-30T04:23:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कर्तव्य बजावताना कायद्याचा बडगा उगारतानाच सामान्यांचा विश्वास प्राप्त करून घेणाऱ्या देशातील ५० पोलीस अधिकाऱ्यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कर्तव्य बजावताना कायद्याचा बडगा उगारतानाच सामान्यांचा विश्वास प्राप्त करून घेणाऱ्या देशातील ५० पोलीस अधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह डॉ. मोहित गर्ग आणि विनीता साहू यांचा समावेश आहे.
फेम इंडिया मॅगझीन, एशिया पोस्ट आणि पीएसयु वॉच सर्व्हे यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या कामांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून तब्बल ७०० अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर स्थानिक पातळीवर लोकांशी संवाद साधून सर्वेक्षण करण्यात आले. त्यात महाराष्ट्रात सेवा बजावणाऱ्या तीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, नवी मुंबईच्या डीसीपी विनीता साहू आणि रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांचा समावेश आहे.
कायदा सर्वांसाठीच समान आहे, मात्र तो राबविताना सामान्यांचा रोष कायम पोलीस दलावर येतो. संकटकाळी ज्यांना हक्काने हाक मारली जाते, त्यांच्याविषयीची सामान्यांची प्रतिमा मलिन असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. कायदा राबविताना सक्षमपणाबरोबरच ज्यांच्यासाठी तो राबवतोय त्यांनाही तो जाचक वाटू नये ही काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याला सामान्य माणसाने दिलेली ही कौतुकाची थाप आहे.
चौकट :
या निकषांवर झाली निवड
कार्यरत असलेल्या ठिकाणचा क्राईम रेटमध्ये झालेली घट. कायदा व सुव्यवस्था राखण्यात आलेले यश. दूरदर्शी विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता कायदा राबविताना सामान्यांना आपलंसं करण्याची कला या निकषांवर ही निवड करण्यात येते. देशभरातील ७०० पोलीस अधिकाऱ्यांची यात निवड केली. त्यातून २०० जणांची यादी करण्यात आली. त्यापैकी ५० पोलीस अधिकाऱ्यांची निवड स्थानिकांशी बोलून करण्यात येते.
कोट :
कोल्हापूरमध्ये उद्भवलेली महापुराची परिस्थिती, ८ निवडणुका आणि त्यानंतर कोरोना या तिन्ही प्रसंगांत सामान्यांना पोलिसांविषयी विश्वासाचे वातावरण करण्यासाठी आम्ही झटलो. त्याचाच हा परिपाक असावा. याविषयी मला आधी काहीच कल्पना नव्हती हा निकाल जाहीर झाल्यानंतरच असा काही सर्व्हे झाला असल्याचे मला समजले.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
फोटो त्यांच्या नावाने सेव्ह केले आहेत.