बाथा हायस्कूल सभागृहात प्रवेश नाकारल्याने महात्मा गांधींना रस्त्यावरच अभिवादन, साताऱ्यात गांधीप्रेमी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 04:01 PM2023-01-31T16:01:15+5:302023-01-31T16:01:39+5:30
ज्या ठिकाणी गांधीजींच्या हत्येचा कट स्वातंत्र्यसेनानी कै. भि. दा. भिलारे गुरुजी यांनी उधळला. त्या बाथा हायस्कूल सभागृहात अभिवादनासाठी शाळा प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने गांधीप्रेमी संतप्त
पाचगणी : पाचगणी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. परंतु ज्या ठिकाणी गांधीजींच्या हत्येचा कट स्वातंत्र्यसेनानी कै. भि. दा. भिलारे गुरुजी यांनी उधळला. त्या बाथा हायस्कूल सभागृहात अभिवादनासाठी शाळा प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने संतप्त गांधीप्रेमींनी रस्त्यावरच बंद गेट बाहेर अभिवादन केले.
महात्मा गांधी स्मारक समिती, पाचगणी नगरपालिका, सह्याद्री पत्रकार संघ, कांताबेन जे. पी. महेता कॉलेज, नगरपालिका शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी अभिवादन करण्यात आले. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी चौकातील पुतळ्याला पुष्पहार घातला.
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, बशीर पटेल, राजेंद्र भिलारे, महेंद्र पांगारे, स्मारक अध्यक्ष प्रा. शिवाजी राऊत, असलम तडसरकर, जालिंदर पाटील, राजपूत, लक्ष्मण हिरवे, रविकांत बेलोशे उपस्थित होते.
दापकेकर म्हणाले, ‘महात्मा गांधी आणि पाचगणी यांचे नाते खूप जवळचे आहे. यासाठी पालिका पाचगणी टेबल लँड येथे आम्ही करीत असलेल्या इंटर पिटेशन सेंटरमध्ये महात्मा गांधीजींच्या माहितीपर वस्तू व लिखाण आम्ही ठेवणार आहे.’
त्यानंतर सर्व जण कस्तुरबा गांधी रुग्णालयात दखल झाले, या ठिकाणी रुग्णालयाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यानंतर सर्व गांधीप्रेमी महात्मा गांधीजींचे प्रार्थनास्थळ असणाऱ्या बाथा हायस्कूल येथे आले. परंतु ट्रस्टीचे कारण देत शाळा प्रशासनाने गांधीप्रेमींना सभागृहात प्रवेश नाकारला. त्यामुळे सर्व गांधीप्रेमी संतप्त झाले.
शाळेच्या गेटवरच रस्त्यावर गांधींना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी अभिवादन करून घोषणा दिल्या. काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने या शाळेच्या प्रशासनाने नाकारले होते. यावर्षीही पुनरावृत्ती झाल्याने नागरिक नाराज झाले.
- पांगारी येथील पहिलीत शिकणाऱ्या पार्थ पांगारे याने महात्मा गांधीजी यांचा वेश परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर त्याने महात्मा गांधीजी यांच्यावर केलेले भाषण तर सर्वांचेच आकर्षण ठरले.
- मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी महात्मा गांधीजींचे वास्तव्य ठरलेल्या बेबी पॉइंट येथे गांधीजींच्या स्मृती जतन करण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी गांधी विचारप्रेमी बशीर पटेल यांना सन्मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.