महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा १५ दिवसांत फेरआढावा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:37+5:302021-05-27T04:40:37+5:30
कोरेगाव : ‘राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे येत्या १५ दिवसांत पुनरावलोकन केले जाईल. तसेच ही योजना राबविणाऱ्या ...
कोरेगाव : ‘राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे येत्या १५ दिवसांत पुनरावलोकन केले जाईल. तसेच ही योजना राबविणाऱ्या खासगी रुग्णालयांचे प्रश्न तातडीने सोडविले जातील,’ अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. जे. टी. पोळ, उपाध्यक्ष डॉ. चिन्मय एरम, कार्यकारिणी सदस्य डॉ. बळीराम बागल, डॉ. बापूसाहेब खांडेकर, डॉ. संजय कदम, डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ. राजेंद्र गोसावी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई येथे मंत्री टोपे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत टोपे यांनी वरील ग्वाही दिली. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. सचिन जाधव व संजीव खानोरकर उपस्थित होते.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत अल्प पॅकेजमध्ये खासगी डॉक्टरांनी सहा लाख ५० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. लोकाभिमुख आणि लोकोपयोगी अशी ही योजना २०११च्या कमी पॅकेजमुळे डॉक्टर राबविण्यास अनुत्सुक असून, पॅकेजची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर टोपे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी शासन, विमा कंपनी आणि हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशन यांची एक समिती स्थापन करून निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.
जिल्हास्तरावर डॉक्टर, रुग्ण आणि महात्मा फुले योजना यांच्यामध्ये चांगला समन्वय होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यासही टोपे यांनी मान्यता दिली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कार्यरत खासगी रुग्णालयांची मागील वर्षापासून प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची बिले ही ताबडतोब देण्याचे निर्देश डॉ. सुधाकर शिंदे यांनी विमा कंपनीला दिले.
शासनाने महात्मा फुले योजनेतून एक एप्रिल २०२१ पासून १२० (आजार) पॅकेजस खासगी रुग्णालयांच्या यादीतून वगळली आहेत. त्यामुळे सामान्य व गरीब रुग्णांना सध्या शस्त्रक्रिया करण्यासाठी विनाकारण खूप खर्च करावा लागत आहे. तेव्हा ही सर्व पॅकेजस खासगी रुग्णालयांना परत द्यावीत. रुग्णांना दिला जाणारा आहार व प्रवास भाडे योजनेतून द्यावे. रुग्णांची तक्रार रुग्णाला डिस्चार्ज दिल्यापासून दहा दिवसांच्या आत करण्यात आल्यास ग्राह्य धरावी. कोरोना काळात रुग्ण संख्या व अपुरे मनुष्यबळ लक्षात घेऊन रुग्णालयांनी विलंबाने सादर केलेली बिले ग्राह्य धरावीत. योजनेतील सेवा व बिले ही करमुक्त असावीत. अनेक लोकांनी या योजनेकडे रुग्णालयाची तक्रार करून पैसे उकळण्याचे मध्यम बनवले आहे. अशा खोट्या तक्रारी करणाऱ्या व विनाकारण रुग्णालयांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, आदी मागण्याही करण्यात आल्या. त्यावरही चर्चा करण्यात आली.
२६कोरगाव
फोटो ओळ : राजेश टोपे यांना निवेदन देताना डॉ. जे. टी. पोळ, शेजारी डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. चिन्मय एरम, डॉ. राजेंद्र गोसावी, डॉ. बळीराम बागल, डॉ. बापूसाहेब खांडेकर, डॉ. संजय कदम, डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य.