महाविकास आघाडी सरकार कुबडीशिवाय चालत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:40+5:302021-07-12T04:24:40+5:30

सातारा : ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोरोना नियंत्रणाबाबत अपयशी ठरलेलं आहे. त्यातीलच कोणीतरी स्वबळावर लढणार, असं सांगत आहेत. मुळातच ...

The Mahavikas Aghadi government cannot function without Kubdi | महाविकास आघाडी सरकार कुबडीशिवाय चालत नाही

महाविकास आघाडी सरकार कुबडीशिवाय चालत नाही

Next

सातारा : ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोरोना नियंत्रणाबाबत अपयशी ठरलेलं आहे. त्यातीलच कोणीतरी स्वबळावर लढणार, असं सांगत आहेत. मुळातच हे सरकार कुबडीशिवाय चालत नाही. त्यामुळे स्वबळाचा नारा करणं हास्यास्पद आहे,’ अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली.

सातारा येथे आल्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची निवासस्थानी आमदार शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टीका केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘कोरोनानं अनेकांचा रोजगार गेला आहे. व्यापाऱ्यांचा रोष वाढत चाललाय. हातावर पोट असणाऱ्यांनी कोठे जायचे, हा प्रश्न आहे. गरिबांसाठी मदतीची योजना नाही. तर रोजगार निर्माण करणाऱ्यांसाठीही काही केले नाही. याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार आहे. शासनाने आता घाबरटपणा सोडायला हवा.’

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आमदार शेलार म्हणाले, अध्यक्षपद निवड हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, त्यांनी निवडणुकीची हिंमत दाखवावी. भास्कर जाधव यांच्या खांद्यावर तिन्हीही पक्षांनी बंदूक ठेवली होती. चूक नसताना भाजपच्या आमदारांना निलंबनाला सामोरं जावं लागलं आहे.

केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार उदयनराजे भोसले यांना स्थान मिळालं नाही. ते नाराज आहेत का? पत्रकारांच्या या प्रश्नावर आमदार शेलार म्हणाले, ‘उदयनराजे हे राजे आहेत. पक्षावर कोणीही नाराज नाही. गोपीनाथ मुंडे यांचे पक्षातील स्थान मोठे व मानाचं आहे. ते कायम राहील. मुंडे कुटुंबातीलही कोणीही पक्षावर नाराज नाही.’

मराठा समाज आरक्षणावर आमदार शेलार म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं. पण, सरकार बदललं की आरक्षणही गेलं. आघाडी शासनाला ते टिकवता आलं नाही. याचे पाप या सरकारकडेच आहे.’

चौकट :

ईडीनं काम करावं का नको...

जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ईडीने (सक्तवसुली संचालनालय) माहिती मागितल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. यावर आमदार आशिष शेलार यांनी चौकशी यंत्रणेनं काम करायचं का नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. कर नाही तर डर कशाला पाहिजे, असे उत्तर दिले. तर सातारा नगरपालिका निवडणूक भाजप लढविणार का? पत्रकारांच्या या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.

.........................................................

Web Title: The Mahavikas Aghadi government cannot function without Kubdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.