राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:28 PM2020-06-27T15:28:32+5:302020-06-27T15:36:18+5:30
काहींना आता खूप वेळ आहे. त्यांना काम नाही आणि त्यांच्याकडे सध्या काही करण्यासारखेही नाही. काहींना काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्याच्यापलीकडे यात फार काही वेगळे नाही. ते प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सातारा : काहींना आता खूप वेळ आहे. त्यांना काम नाही आणि त्यांच्याकडे सध्या काही करण्यासारखेही नाही. काहींना काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्याच्यापलीकडे यात फार काही वेगळे नाही. ते प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीनंतर येथील विश्रामगृहावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, मला माहीत आहे की, माझ्या विरोधात लोकसभा लढवली तिथे अनामत जप्त झाली. बारामती विधानसभा लढवली तिथे अनामत जप्त झाली. सांगली लोकसभा लढवली आणि तिथेही अनामत जप्त झाली, असे माझ्या वाचनात आले. जे बारामतीत पडले, सांगलीत पडले आणि अशा लोकांना समाजाने ज्या-त्यावेळी बाजूला केले. त्या लोकांची आपण नोंद तरी कशाला ठेवायची.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा उल्लेख इनसायडरला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यात त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेच्या अनुषंगाने टीका केली होती. त्याचा संदर्भ देऊन शरद पवार यांना विचारले असता त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या टीकेला कोणताही आधार नाही.
ते म्हणाले, गोपीचंद पडळकर यांच्या त्या टीकेला फार काही महत्त्व द्यावे आणि त्याला उत्तर द्यावे, असे वाटत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही काम राहिलेले नाही, ते दुर्लक्षित आहेत. माझ्यावर टीका करून ते प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत.
सतत होत असलेल्या इंधन दरवाढीच्या प्रश्नावर बोलताना खासदार पवार म्हणाले, पेट्रोल, डिझेल या इंधनांची रोज दरवाढ होत आहे. इतिहासात असं कधी पाहिलं नाही. देश संकटात आहे. असे असतानाही केंद्र सरकार आवश्यक वस्तू महाग करत आहे. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होतो आहे. लॉकडाऊनमुळे लोक गप्प आहेत. लोक सहन करतात म्हणून केंद्रशासन गैरफायदा घेत आहे.
गलवान येथील सीमावर्ती भागात घुसखोरी करत असताना केंद्र सरकार कमी पडत आहे काय? या प्रश्नावर बोलताना खासदार पवार म्हणाले, ह्यगलवान परिसरात भारत रस्ता तयार करतोय. सियाचीन भागातील दळण-वळणासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर चीनचे सैन्य घुसखोरी करत आहे. अशा घटना वारंवार घडतात; परंतु १९९३ मध्ये मी संरक्षणमंत्री असताना या परिसरात दोन्ही सैन्यांनी शस्त्राचा वापर करायचा नाही, असा करार केला होता.
सध्याच्या परिस्थितीत देखील कुठेही दोन्ही देशांच्या सैनिकांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेले नाही. हानामारीचे प्रकार घडले. यामध्येच केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचं अपयश आहे, असे म्हणता येणार नाही. तो आरोपही अयोग्य ठरेल. चिनने १९६२ नंतर भारताचा ३६ हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतला, हे सत्य आहे आणि याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आलेलं दिसतंय, त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, असं मला वाटतं."
कोरोनाच्या लॉकडाऊननमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्रात विविध उद्योगांत काम करणारे परराज्यातील मजूर त्यांच्या मनामध्ये कोरोनाविषयीची भीती निर्माण झाली होती. विशेषत: मुंबईत कोरोना वाढत असल्याने ही भीती अधिक बळावलेली होती.
लोकांच्या मनातील भीती जावी लोकांना कोरोनासोबत जगायचे आहे, याचा विश्वास निर्माण व्हावा, यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. महाराष्ट्रातील माध्यमे फारच जागृत असल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद कोरोनाची परिस्थिती अधिक ठळकपणे आली. यातूनच लोकांनी भीती घेतली असल्याचा चिमटादेखील खासदार पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांना काढला.
नागरी सहकारी बँका व मल्टिस्टेट बँका यांच्यावर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण आणण्याचा केंद्रशासन केंद्र शासनाने घेतलेला निर्णय हा सहकार चळवळीसाठी बाधक ठरू शकतो. सहकार चळवळ संकुचित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप देखील खासदार पवार यांनी केला. तसेच शेती क्षेत्रातील अभ्यास असणारे राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर घेणे माझी जबाबदारी होती, ती मी पूर्ण केली आहे, असं स्पष्टीकरणही खा. पवार यांनी एका प्रश्नाबाबत केले.