सरकारला सत्तेवरुन खेचण्यासाठी महाविकास आघाडी हवी - सुषमा अंधारे 

By नितीन काळेल | Published: May 9, 2023 06:54 PM2023-05-09T18:54:32+5:302023-05-09T19:14:14+5:30

'शिंदे गटाचे आमदार महिलांबद्दल हीन बोलतात'

Mahavikas Aghadi is needed to pull the government from power says Sushma Andhare | सरकारला सत्तेवरुन खेचण्यासाठी महाविकास आघाडी हवी - सुषमा अंधारे 

सरकारला सत्तेवरुन खेचण्यासाठी महाविकास आघाडी हवी - सुषमा अंधारे 

googlenewsNext

नितीन काळेल

सातारा : ‘जागतिकीकरणाच्या रगाड्यात भटके जास्त विस्थापित झाले. या भटक्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच राजकारणात आले. त्यामुळे धगीचे आयुष्य जगले म्हणूनच बोलण्यात रग आहे. मात्र, सत्तार असो किंवा शिरसाट हे शिंदे गटाचे आमदार महिलांबद्दल हिन बोलतात. या सरकारला सत्तेवरुन खेचायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार हवं,’ असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला. दरम्यान, मनोगतावेळी अंधारे या अनेकवेळा भावूकही होताना दिसल्या.

जकातवाडी, ता. सातारा येथील शारदाश्रमात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अंधारे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ‘उपरा’कार लक्ष्मण माने, सारंग पाटील आदी उपस्थित होते. यावेळी फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना, जीवन गाैरव पुरस्कार सुषमा अंधारे आणि यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्यिक पुरस्कार अरुण जावळे यांना प्रदान करण्यात आला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘भटक्या समाजातील एखादा-दुसरा शिकतो त्याला आधार मिळतो. आम्हाला संधी मिळाली की त्याचे सोने करतो. पण, मुख्य प्रवाहातील लोकांना आमचे प्रश्न समजत नव्हते. देशात वाघ, हत्तींची गणना होते. मात्र, भटक्यांची होत नाही. जनावरांपेक्षा वाईट स्थिती भटक्यांची आहे. ही पालातील माणसं असलीतरी नैतिकता पाळतात. चुकीचं पाऊल पडू देत नाहीत. पण, भय, भ्रम आणि चारित्रहनन ही शस्त्रे मनुवाद्याची आहेत.

शरद पवार म्हणाले, ‘भटक्या विमुक्तांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम लक्ष्मण माने आणि सहकारी ४० वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या आमच्याकडून अपेक्षा असतात. त्या योग्यच राहतात. या अपेक्षांची पूर्तता करण्याचे काम आम्ही करु. यासाठी लक्ष्मण माने यांच्या पाठिशी उभे राहूया.

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले, ‘देशात ६० ते ७० कोटी मध्यमवर्ग आहे. २५ कोटी मध्यमवर्गातील मतदार आहेत. मध्यमवर्ग वोट बॅंक असल्याने लक्ष देण्यात येते. गेल्या ७५ वर्षांत मध्यमवर्गाचा विकास झाला. त्यामुळे गरीबी कमी झाली असलीतरी विषमता वाढली आहे. राजकारणावर प्रभाव टाकणारी चळवळ हवी. तरच ही विषमता कमी होईल.

अंधारेंच्या आईची उपस्थिती अन् शरद पवारांना पत्र...

सुषमा अंधारे यांनी मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात करताच आज प्रथमच आई अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिली हे स्पष्ट केले. यावेळी त्या भावूक झाल्या. तसेच त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. त्यानंतर मनोगतात भटक्या समाजाबद्दल त्या तळमळीने बोलत असताना त्यांना हुंदका आवरता येत नव्हता. राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांना अंधारे यांनी पत्र पाठविले होते. हे पत्र अंधारे यांनी वाचून दाखविले. हे पत्र भावनिक होते. या पत्रावर पवारांनी केलेली विचारपूस अंधारे यांनी कथन केली. यावेळीही अंधारे या भावूक झाल्याचे दिसून आले.

Web Title: Mahavikas Aghadi is needed to pull the government from power says Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.