कामगारांना बळकटी देण्यासाठी महायुती खंबीर! - मंत्री डॉ. सुरेश खाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 11:42 AM2024-09-21T11:42:04+5:302024-09-21T11:42:41+5:30
विंग-शिंदेवाडी येथे बांधकाम कामगार संमेलन उत्साहात
कऱ्हाड : राज्याच्या विकासात सर्वस्तरातील कामगारांचे मोठे योगदान आहे. या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना बळकटी मिळवून देण्यासाठी महायुती शासन खंबीर असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. विंग-शिंदेवाडी (ता. कऱ्हाड) येथे भाजप कामगार मोर्चातर्फे शुक्रवारी बांधकाम कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंत्री खाडे यांच्या हस्ते कऱ्हाड दक्षिणमधील २ हजार ४९२ लाभार्थी बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना भांडी वाटप व बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यामध्ये सर्वाधिक बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती शासन प्रयत्नशील असून, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना याबाबतची माहिती देत आहोत. तसेच त्यांच्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे.
यावेळी जिल्ह्याचे कामगार आयुक्त रेवणसिद्ध भिसले, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे, शामबाला घोडके, समृद्धी जाधव, भाजप कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ उमराणी, तालुकाध्यक्ष रुपेश देसाई, योगेश पाटील, सागर पाटील, विकास साळुंखे उपस्थित होते.