‘मेहेरबानी’मुळं ओढ्यांची झाली गटारं!

By admin | Published: December 27, 2015 09:58 PM2015-12-27T21:58:13+5:302015-12-28T00:53:15+5:30

करवाढीवर तीव्र नाराजी : राजकीय वैमनस्यापोटी ‘चेहरे बघून’ कामं करीत असल्याचा नागरिकांचा नगरसेवकांवर आरोप -लोकमत आपल्या प्रभागात

'Maherabani' triggered the flow of the group! | ‘मेहेरबानी’मुळं ओढ्यांची झाली गटारं!

‘मेहेरबानी’मुळं ओढ्यांची झाली गटारं!

Next

सातारा : डोंगरउतारावरून वाहणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांवर नगरसेवकांच्या हितसंबंधी लोकांनी अतिक्रमण केल्यामुळं ओढ्यांची ‘गटारं’ झाली आहेत आणि साफसफाई नसल्यामुळं तीही तुंबली आहेत. ऊग्र वासात नाक आणि जीव मुठीत धरून अनारोग्याचा श्वास घेणारे रहिवासी नगरसेवकांवर राजकीय वैमनस्यापोटी विकासापासून वंचित ठेवल्याचा थेट आरोप करीत आहेत. त्यातच भरमसाठ करवाढीमुळं पराकोटीला पोहोचलेली नाराजी आणि तक्रारींवर तक्रारी करूनही वाट्याला आलेली उपेक्षा हाच प्रभाग क्रमांक दहाच्या एकंदर परिस्थितीचा ‘लसावि’ आहे.शनिवार माचीपासून बोगद्यापर्यंतच्या डोंगरउतारावरचा भाग, समर्थ मंदिरपासून बोगदा आणि चिपळूणकर बागेकडे जाणारे दोन रस्ते, त्यांना छेदणाऱ्या लहान गल्ल्या आणि जुन्या क्रशरपासून खाऱ्या विहिरीपर्यंत पसरलेली मुख्यत्वे कमी उत्पन्नगटातील लोकांची वस्ती, वाढत चाललेल्या मध्यमवर्गीयांच्या कॉलन्या आणि वेगानं उभ्या रहात असलेल्या अपार्टमेन्ट अशा संमिश्र लोकवस्तीच्या प्रभाग दहाला तीन नगरसेवक, काही काळासाठी एक स्वीकृत नगरसेवक आणि सव्वा वर्षासाठी नगराध्यक्षपद लाभलं. परंतु अपवाद वगळता नगरसेवक आपली कामं करतात, असं म्हणणारे लोक भेटत नाहीत. अजिंक्यतारा आणि पॉवर हाउस टेकडीच्या उतारावर वसलेला हा भाग आहे. साहजिकच डोंगरावरून येणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांची संख्या इथं जास्त आहे. मात्र, दुर्लक्षामुळं बहुतांश ओढ्यांवर अतिक्रमणं होऊन ते संकोचले आहेत. तीव्र चढणीवरील भागात रस्तेच नाहीत, तिथं गटारांची काय कथा! मोकळ्या जागेतूनच पाणी वाहून येतं आणि ओढे अडविल्यामुळं इतस्तत: पसरतं. समर्थ मंदिराजवळ कचऱ्यानं भरलेल्या छोट्याशा प्रवाहालाच ‘ओढा’ म्हटलं जातं. दुर्गंधी, मच्छर आणि तऱ्हेत़ऱ्हेचे कीटक नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागलेत. नव्यानं झालेल्या इमारती आणि कॉलन्यांमध्ये विशेषकरून वयोवृद्ध नागरिक अधिक संख्येनं राहतात. डॉक्टर आणि औषधपाण्याचा खर्च डोईजड झाला असतानाच कोणत्याही सुविधा न पुरविणाऱ्या पालिकेनं तीस टक्के करवाढ केल्यामुळं ज्येष्ठांमध्ये तीव्र असंतोष आहे. समर्थ मंदिराच्या आसपास तब्बल १८ डॉक्टरांचे दवाखाने आहेत; पण रुग्णांसाठी स्वच्छतागृहांची सोय अभावानंच असल्यामुळं रुग्ण, नातेवाईक परिसरात उघड्यावरच सोय शोधतात. परिणामी पवित्र मंदिराच्या परिसरातच प्रचंड दुर्गंधी जाणवते. चिपळूणकर बाग परिसरात फेरफटका मारल्यावर पालिकेला ‘निर्मल शहर’ पुरस्कार मिळालाच कसा, हा प्रश्न पडतो. भोई गल्लीचे नागरिक नव्या जलवाहिन्या टाकल्यापासून आजअखेर रस्त्याची वाट पाहत आहेत; पण परिसरातील सगळे रस्ते झाले तरी हाच एकमेव रस्ता खडबडीत राहिल्यामुळं इथले लोक ही ‘राजकीय उपेक्षा’ असल्याचा थेट आरोप करतात. फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त होत नाहीत, कचरा उचलला जात नाही, गटारे साफ होत नाहीत, अशा त्यांच्या तक्रारी आहेत.
(लोकमत चमू)


नगरसेविका आल्या... कुणी नाही पाहिल्या!
‘लोकमत चमू’ समर्थ मंदिर येथे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत असल्याचे समजताच प्रभागातील नगरसेविका मनीषा भणगे त्या ठिकाणी दाखल झाल्या. आपण परगावी जाणार असल्याचे सांगून त्यांनी आपली बाजू तिथेच मांडली. त्यावेळी नागरिक तक्रारी मांडून परत जाण्याच्या तयारीत होते. विशेष म्हणजे, नगरसेविका तेथे आल्यानंतर नागरिकांपैकी कोणीही त्यांच्याशी संपर्क साधला नाही की त्यांच्याकडे पाहून स्मितहास्यही केलं नाही. जणू नागरिकांची त्यांच्याशी ओळखच नाही, असं आश्चर्यजनक वातावरण दिसलं.

ठराविक वस्त्यांनाच मुबलक पाणी?
बोगद्यापासून तीव्र उतारावर असलेल्या वस्त्यांपैकी काही वस्त्यांमध्ये सुमारे तीन तास पाणी असते तर इतर वस्त्यांमध्ये तासभरही पाणी येत नाही. याउलट भोई गल्लीत रोज पहाटे साडेतीनला पाणी येतं. उठायला थोडा उशीर झाला तरी पाणी मिळत नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली. सर्वच बाबतीत ठराविक लोकांना सुविधा द्यायच्या आणि ठराविक लोकांना उपेक्षित ठेवायचं, अशी नीती खेळली जात असल्याची तक्रार खोटी ठरविण्याचं आव्हान आता नगरसेवकांसमोर आहे. एका योजनेचा निधी दुसऱ्या योजनेवर खर्च केल्याच्या तक्रारी घेऊनही नागरिक आले होते. यासंदर्भात लोकायुक्तांपर्यंत सर्वत्र तक्रारी करणारे कार्यकर्तेही इथं भेटतात.

ओढ्यांचे रुंदीकरण, खोलीकरण तातडीचे
पॉवर हाउस डोंगरावर झोपड्या झपाट्यानं वाढल्या आहेत. अजिंक्यताऱ्याच्या कुशीतही नवी बांधकामं बरीच वाढली आहेत. पुढील शंभर वर्षांचा विचार करून डोंगरावरून वाहत येणाऱ्या ओढ्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरण तातडीनं करण्याची गरज द्रष्ट्या नागरिकांना वाटते. रोडावलेल्या ओढ्यांनी पवित्र मंदिरांचे परिसरही अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त झाले आहेत. त्यामुळं ओढ्यांवरील अतिक्रमणं तातडीनं काढून भविष्यातील अनर्थ टाळण्याची विनंती नागरिकांनी केली आहे.

Web Title: 'Maherabani' triggered the flow of the group!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.