पहिल्याच पावसात महिंद धरण भरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:57+5:302021-06-25T04:26:57+5:30
सणबूर : ढेबेवाडी विभागातील वांग नदीवरील महिंद धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत ...
सणबूर : ढेबेवाडी विभागातील वांग नदीवरील महिंद धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
ढेबेवाडीपासून सुमारे दहा किलोमीटरवरील महिंद गावाजवळ बांधलेल्या धरणाला चांगली नैसर्गिक अनुकूलता लाभली आहे. डोंगरातून, नदी, नाले व ओढ्यातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच हे धरण ‘ओव्हर फ्लो’ होते. ढेबेवाडी खोऱ्यातील अनेक गावांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या धरणामुळे सुटला असून, पावसाळ्यात धरण भरतेय कधी? याकडेच येथील जनतेचे लक्ष लागलेले असते. ८५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या महिंद धरणाचे पाणलोट क्षेत्र ३५.९८ चौरस किलोमीटरचे असून, ३६२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. गतवर्षी आणि यंदाही मान्सूनपूर्वी झालेल्या वादळी पावसाने धरण भरायला बराच हातभार लागला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी ते लवकर भरले आहे. धरणाच्या १०४ मीटरच्या मुक्तपतन पद्धतीच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. मध्यंतरी धरणाच्या दगडी सांडव्याची पडझड झाल्याने धरणाला धोका निर्माण झाला होता. मात्र, पाटबंधारे विभागाच्या मार्गदर्शनाखाली महेश पाटील कंपनीने यशस्वी जॅकेटिंग केल्याने हा धोका कमी झाला आहे.
गत २१ वर्षांमध्ये धरणात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यासाठी वारंवार नियोजन केले जात असले तरी अद्याप गाळ निघालेलाच नाही. सध्या धरण ओसंडून वाहत असले तरी त्या परिसरात ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून ये-जा करू नये. पोलिसांचे त्या परिसरात नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. जीव धोक्यात घालून धरण परिसरात जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
फोटो : २४केआरडी०३
कॅप्शन : ढेबेवाडी विभागातील महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहत आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)