मैत्रेयच्या ‘पॉवर्टी लाईट’चा जगात डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:34+5:302021-03-05T04:39:34+5:30

सातारा : गावखेडे आणि वाड्या-वस्त्यांवर जिथं विजेअभावी जगणाऱ्यांमध्ये दृष्टिपटलाचे आजार कमी वयात आढळून येत आहेत, हे रोखायला साताऱ्याच्या मैत्रेय ...

Maitreya's 'Poverty Light' shines in the world | मैत्रेयच्या ‘पॉवर्टी लाईट’चा जगात डंका

मैत्रेयच्या ‘पॉवर्टी लाईट’चा जगात डंका

Next

सातारा : गावखेडे आणि वाड्या-वस्त्यांवर जिथं विजेअभावी जगणाऱ्यांमध्ये दृष्टिपटलाचे आजार कमी वयात आढळून येत आहेत, हे रोखायला साताऱ्याच्या मैत्रेय जयंत पांडे याने दृष्टी शाबूत ठेवण्यासाठी आवश्यक असणारे ‘आफताब लाईट मॅग्निफायर’ बनवले. मैत्रेयच्या या पाॅवर्टी लाईटची निवड तायवान इंटरनॅशनल स्टुडंट डिझाईन स्पर्धेत झाली आहे. देशभरातून अवघ्या अकरा उपकरणांची निवड झाली. यात महाराष्ट्रातून मैत्रेयचे एकमेव उपकरण पात्र ठरले.

डिझायनिंग क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार म्हणून गणल्या गेलेल्या तायवान इंटरनॅशल स्टुडंट डिझाईन स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. एक महिना आधी या स्पर्धेची थीम समाजमाध्यमाद्वारे डिझायनिंगच्या क्षेत्रात जाहीर केली जाते. यंदा ‘अ‍ॅक्शन’ हा शब्द जाहीर करण्यात आला. साताऱ्यातील रहिवासी आणि गुजरात गांधीनगर येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रीयल डिझायनिंगच्या प्रोडक्ट मास्टर डिझायनर या अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या मैत्रेय पांडे आणि रश्मी नारायणन्‌ या दोघांनी यात सहभागी होण्याचं ठरवलं. अ‍ॅक्शन या शब्दाचा आधार घेऊन त्याद्वारे शाश्वत विकास कसा साध्य करता येईल, यासाठी त्यांनी तब्बल ३०० हून अधिक शब्दांचा आधार घेतला. दिवसभर ऑनलाईन लेक्चर केल्यानंतर रात्री आठ ते दहा असे दोन तास हे दोघे दुसऱ्या दिवशीच्या संशोधनाचे नियोजन करत होते.

भारतात पर्यटनाच्या निमित्ताने फिरताना मैत्रेयला कंदील, मेणबत्ती, दिवा यांच्या आधाराने घरात प्रकाश निर्माण करणारी माणसं आठवली. कमी प्रकाशात डोळ्यांना ताण दिल्यामुळे त्यांच्यात दृष्टिपटलाच्या गंभीर समस्या उद्भवत असल्याचे त्याला संशोधनाअंती समजले. तुझ्या अभ्यासातून दुर्लक्षित घटकांचाही विकास व्हावा, हे आई मनीषा पांडे यांचे वाक्यही त्याच्या मनात घोळत होते. समाजातील या घटकांकडे असणाऱ्या वस्तूंपासूनच पाचपट प्रकाश निर्माण करणारे ‘लाईट मॅग्निफायर’ बनविण्याचं त्यांनी ठरवलं.

जगभरातील तब्बल ८० हजार विद्यार्थ्यांनी महिनाभर काम करून विविध उपकरणं बनवली. त्यापैकी भारतातून केवळ ११ उपकरणांची निवड झाली, त्यात महाराष्ट्रातून मैत्रेय आणि रश्मी यांच्या उपकरणाचा समावेश आहे.

कोट :

अभियांत्रिकी अभ्यास करण्यामागे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्य आणि दुर्लक्षित घटकांसाठी शाश्वत उपकरण निर्मिती करण्याचा माझा उद्देश होता. ‘आफताब’चे डिझाईन इन्स्टिट्यूटला पसंत पडले. भविष्यात त्याच्या निर्मितीचीही प्रक्रिया सुरू होईल.

- मैत्रेय पांडे, संशोधक विद्यार्थी, सातारा

असं काम करेल ‘आफताब’...

उर्दू भाषेत आफताब म्हणजे सूर्य! सूर्याचं तेज ज्याप्रमाणे विश्वाला प्रकाशित करतं, तसंच मैत्रेयने तयार केलेल्या उपकरणात बल्ब, मेणबत्ती, दिवा ठेवला, तर ते पाचपट प्रकाश वाढवते. यासाठी बोरोसिल ग्लासचा वापर करण्यात आला आहे. उपकरणात तयार होणारी उष्णता बाहेर फेकण्यासाठी व्हेंटिलेशनची सोय करण्यात आली आहे. या उपकरणाच्या वापराने ट्युबलाईटसारखा प्रकाश तयार होतो. याद्वारे उजेडाचा परिघ वाढण्यास मदत होते.

..........

Web Title: Maitreya's 'Poverty Light' shines in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.