सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांची दैना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 01:55 PM2021-12-02T13:55:55+5:302021-12-02T13:56:50+5:30
शेतात पाणी साठल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सातारा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सहकारी साखर कारखान्यांची ऊसतोड बंद झाली असून द्राक्ष बागायतदारांनाही मोठा फटका बसला आहे. गहू आणि हरभरा पेरणी झाल्यानंतर शेतात पाणी साठल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. या नुकसानीची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. सातारा, कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, वाई, खंडाळा यासह फलटण आणि माण, खटावमध्येही पाऊस सुरु असल्याने त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कऱ्हाड परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याची केलेली पेरणी वाया जाण्याची भीती आहे.
कऱ्हाड तालुक्यात पाचवड फाटा येथे शेतात आणि सेवा रस्त्यावर पाणी साचले आहे. शेतात पाणी साचल्यामुळे ऊसतोड बंद झाली असून ऊसतोड मजूरांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. ऊसतोड मजूरांच्या झोडपड्यांमध्येही पाणी शिरले असून आता त्यांना त्यांचा संसार शेताच्या बांधावर थाटावा लागला आहे. अनेकांनी रात्रभर जागूनच काढली. रेठरे वाठार येथील रस्त्यावरही पाणी आले आहे. नारायणवाडी येथील शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले असून कराड - ओंड रस्त्यावर पाणी आल्याने पाचवड फाटा येथील दुकानात पाणी शिरले आहे. कराड येथील दत्त चौकातील दुकानांमध्येही पाणी शिरले आहे.
सातारा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून सकाळी साडे दहा वाजेपर्यंत ४०. १ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३०. ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी ( मि. मी. )
सातारा - ४०.१ मि. मी.
जावळी - ५. ८ मि. मी.
पाटण - ३१. ९ मि. मी.
कराड - २९. १ मि. मी.
कोरेगाव - २४. २ मि. मी.
खटाव - वडूज - २४. ८ मि. मी.
माण - दहिवडी - ३२. ८ मि. मी.
फलटण - २५. ६ मि. मी
खंडाळा - २७.१ मि. मी.
वाई - ३०. ८ मि. मी.
महाबळेश्वर ३७.७ मि. मी.