पावसाचे पाणी घरात शिरल्याने मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:29 AM2021-06-06T04:29:29+5:302021-06-06T04:29:29+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाॅंधार पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप ...
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाॅंधार पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप हंगाम पेरणीसाठी मशागत केलेल्या शेतातील माती वाहून गेली आहे तर बामणवाडी येथे घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. जनावरांसाठी साठवून ठेवलेला सुका चाराही भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
कुसूर परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पडलेल्या धुवाॅंधार पावसाने शेताचे मोठ्या नुकसान झाले आहे. बामणवाडी येथील डोंगरातून येणारे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने पावसाचे पाणी थेट गावात शिरले. यामुळे शेवंताबाई जालिंदर काटेकर यांच्या घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात, जनावरांच्या शेडमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. तर खरीप हंगाम पेरणीसाठी मशागत केलेल्या शेतातील माती वाहून गेली आहे. गत चार दिवसांपासून काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. पेरणी केलेली शेते बियाण्यासह पाण्याने धुवून नेल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बामणवाडी येथील डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह काही लोकांनी बंद केल्याने सर्व पाणी गावात घुसले आहे. मोठ्या प्रमाणावर वाहून आलेले हे पाणी अनेक घरांमध्ये शिरून संसारोपयोगी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता नुकसानग्रस्तांमधून विचारला जात आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंद केलेल्यांवर कारवाई करून हे प्रवाह पूर्ववत करून गावात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी होत आहे.
फोटो ०४ कुसूर-रेन
कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथे शनिवारी मान्सूनपूर्व पावसाचे पाणी घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. (छाया : गणेश काटेकर)