सातारा जिल्ह्यात उन्हाळी पीक क्षेत्रात घट; दीड हजार हेक्टरवरच झाली पेरणी

By नितीन काळेल | Published: May 13, 2024 07:06 PM2024-05-13T19:06:22+5:302024-05-13T19:14:07+5:30

दुष्काळाची झळ; खरीपसाठी पाऊस महत्वाचा 

Major decline in summer crop area in Satara district; 32 percent area | सातारा जिल्ह्यात उन्हाळी पीक क्षेत्रात घट; दीड हजार हेक्टरवरच झाली पेरणी

सातारा जिल्ह्यात उन्हाळी पीक क्षेत्रात घट; दीड हजार हेक्टरवरच झाली पेरणी

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ असल्याने यावर्षी उन्हाळी पिकाची हवाच गेली आहे. त्यामुळे सुमारे दीड हजार हेक्टरवरच पेरणी झाली. ३२.३० टक्के हे प्रमाण आहे. तर आता खरीप हंगामावरच शेतकऱ्यांची भीस्त असून सर्वांचेच मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लागले आहेत.

जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वात मोठा हंगाम असतो. सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र राहते. तर रब्बीत दोन लाख हेक्टरवर पेरणी होते. जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप हंगाम पेरणीची गडबड सुरू राहते. या मान्सूनवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पिकांचे गणित अवलंबून असते. पर्जन्यमान चांगले झाले तर खरीप आणि रब्बी हंगामही पदरी पडतो. तसेच उन्हाळी हंगामातही शेतकरी पिके घेतो. पण, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरे पर्जन्यमान झाले. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला. उत्पादन कमी झाले. त्यातच दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामावर परिणाम झाला.

कृषी विभागाकडून सातारा जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ८६० हेक्टर निश्चीत करण्यात आले होते. यामध्ये उन्हाळी भुईमूग, मका, सूर्यफूल, सोयाबीन ही पिके शेतकरी घेतील असा अंदाज होता. मात्र, भुईमूग, मका, सोयाबीन पिके घेण्यात आली. सूर्यफुलाची कोठेही पेरणी झालेली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या धसक्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे.

भुईमूग ११२४ तर मका ४१३ हेक्टरवर..

जिल्ह्यात उन्हाळ्यात २ हजार ६९९ हेक्टरवर भुईमूग घेण्यात येईल असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात १ हजार १२४ हेक्टरवर पेर झाली. ४१.६७ टक्के पेरणी प्रमाण आहे. तर मकाचे सर्वसाधारण क्षेत्र २ हजार ७४ हेक्टर होते. तर पेरणी ४१३ हेक्टरवर झाली. सुमारे २० टक्के क्षेत्रावरच मका पिकाची पेरणी झालेली आहे. सातारा तालुक्यात ३७२ हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र होते. पण, पेरणी १४१ हेक्टरवरच झालेली आहे. तसेच जावळीत ३२ हेक्टर, पाटण २०६ हेक्टर, कऱ्हाड तालुक्यात ९३, कोरेगाव ६४, खटाव ४५३, माण ४८ हेक्टर, खंडाळा ९३, फलटण १०३ आणि वाई तालुक्यात ३४ हेक्टरवर उन्हाळी पिके घेण्यात आलेली आहेत.

उन्हाळी सोयाबीन १६०० वरुन १४ हेक्टरवर..

मागील तीन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले. तसेच दोन वर्षांपूर्वी उन्हाळी सोयाबीन १ हजार ६०० हेक्टरवर घेण्यात आले होते. पण, गेल्या वर्षभरापासून सोयाबीनला दर कमी मिळत आहे. त्यातच दुष्काळी स्थिती असल्याने यंदा उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सोयाबीनचे अंदाजे क्षेत्र ३१ हेक्टर निश्चीत करण्यात आलेले. प्रत्यक्षात १४ हेक्टरवर पेरणी झाल्याचे समोर आलेले आहे.

Web Title: Major decline in summer crop area in Satara district; 32 percent area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.