आनेवाडी, तासवडे टोलनाका सातारकरांना मोफत करा, शिवसेना आक्रमक
By नितीन काळेल | Published: January 13, 2024 06:08 PM2024-01-13T18:08:29+5:302024-01-13T18:09:00+5:30
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख मोहिते यांनी हा इशारा दिला.
सातारा : सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर कमी अंतरासाठीही सातारकरांना टोलची रक्कम भरावी लागते. ही सातारकरांची अक्षरक्षा लूट आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात स्थानिकांना टोलमाफी आहे, तसेच साताऱ्यातील टोलनाक्यावरही जिल्हावासीयांना माफी मिळावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केली आहे. तसेच १५ जानेवारीला आनेवाडी टोलनाक्यावर लुटमार थांबविण्यासाठी ठिय्या मांडण्याचा इशाराही दिला आहे.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख मोहिते यांनी हा इशारा दिला. यावेळी जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, जिल्हा संघटिका सुनंदा महामुलकर, सातारा तालुकाप्रमुख सागर रायते, प्रशांत पवार, शहरप्रमुख शिवराज टोणपे, उपजिल्हा समन्वयक प्रशांत शेळके, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे यांच्यासह इम्रान बागवान, रवींद्र भणगे, हरिदास पवार, किशोर घोरपडे, आकाश पवार, सुरेश कांबळे, नीलेश चव्हाण, सागर कदम आदी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यातून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या मार्गावर सातारा जिल्ह्यात आनेवाडी आणि तासवडे येथे दोन टोलनाके आहेत. सातारच्या नागरिकांना जिल्हांतर्गत कोठे जायचे झाल्यास तसेच कमी अंतरासाठी जायचे म्हटले तर अन्यायकारक अशी टोलची रक्कम भरावी लागते. ही सातारकर नागरिकांची एकप्रकारे लूट आहे. या कारणाने स्थानिक नागरिक आणि टोल प्रशासनामध्ये वारंवार वाद होतात. वास्तविक एका बाजुला रस्त्याचा कर भरून घेतला जात असताना मागील २० वर्षांपासून अन्यायकारकपणे टोल घेतला जात आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफीतून वगळावे, अशी आमची मागणी आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून काहीही सकारात्मक आलेले नाही. त्यामुळे दि. १५ जानेवारीला आनेवाडी टोलनाक्यावर ठिय्या मांडणार आहे. आता सातारकरांना टोलमधून वगळल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.
टोलमाफीशिवाय लढा थांबणार नाही...
महामार्गावर खड्डे पडलेले असतात. ते कधी मुजवले जात नाहीत. महामार्गावरील अधिक अपघात हे वेगाने वाहन जाण्याने होत नाहीत तर खड्ड्यामुळे होतात. त्यातच देशात अघोषित युद्ध सुरू आहे. सरकार आणि उद्योगपतींची युती आहे. त्यामुळेच नागरिकांना टोल भरावा लागतोय. सातारा जिल्ह्यातील या टोलमुक्तीच्या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे. हा जिल्ह्याचा लढा आहे. तसेच सातारकरांना टोलमाफी मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.