लाॅकडाऊनचा सदुपयोग; खासदारांची गहू काढण्यास पसंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:38 AM2021-04-11T04:38:02+5:302021-04-11T04:38:02+5:30
कराड : नुसतं लाॅकडाऊन म्हटलं तरी आज अनेकांच्या काळजात धस्स होतंय! मग वेळ कसा घालवायचा ? हा प्रश्न ...
कराड : नुसतं लाॅकडाऊन म्हटलं तरी आज अनेकांच्या काळजात धस्स होतंय! मग वेळ कसा घालवायचा ? हा प्रश्न त्यांना सतावतोय. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लाॅकडाऊन केलाच आहे. पण याच लाॅकडाऊनचा सदुपयोग कसा करता येऊ शकतो हे कराडचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी कृतीतून दाखवून दिलंय. शनिवारी त्यांनी आपल्या हातात चक्क विळा घेत शेतातील गहू काढण्याच्या कामाला पसंती दिली. त्यांच्या या साधेपणाची चर्चा लोकांच्यात झाली नाही तर नवलच !
राजकारणी नेते नेहमीच माणसांच्या, कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. ती त्यांना सवयच लागून गेलेली असते. श्रीनिवास पाटील यांच्याकडे तर नेहमीच लोकांची मोठी वर्दळ असते. कराड येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात त्याची प्रचिती दररोज येते. पण वीकेंड लाॅकडाऊन असल्याने शनिवारी त्यांचे संपर्क कार्यालय सुनं सुनं दिसत होते.
लाॅकडाऊन असल्यामुळे कार्यालयाकडे कोणी येणारच नव्हते हे खासदार पाटील यांनी ओळखले होते. मग आज वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना पडला होता. तोवर घरा पाठीमागे असणाऱ्या शेतात कामगार गहू काढण्याचे काम करीत आहेत हे त्यांना समजले. मग काय एरव्ही डोक्यावर टोपी, अंगात पांढरा शर्ट असा पोषाख असणाऱ्या श्रीनिवास पाटलांनी आपले कपडे बदलले. अंगात टी-शर्ट , साधी पॅन्ट परिधान केली. हातात विळा घेतला अन ते थेट शेतात पोहोचले . तेथे असणाऱ्या कामगारांना त्यांनी मदत करायला सुरुवात केली. त्यांच्या कृतीतून त्यांचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे.
अनेक वर्षे प्रशासनात काम केलेले, मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे खासदार श्रीनिवास पाटील यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातला साधेपणा प्रत्येकालाच भावतो. तोच साधेपणा आज पुन्हा एकदा दिसून आला. समाज माध्यमावर त्याचे फोटो फिरू लागले.अन त्यांच्या साधेपणाची पुन्हा चर्चा सुरू झाली.
फोटो