वेळे ढेण कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन तातडीने करा
By admin | Published: June 20, 2017 05:41 PM2017-06-20T17:41:04+5:302017-06-20T17:41:04+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. २0 : कोयना प्रकल्पग्रस्त वेळे ढेण, ता. जावळी या गावातील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पग्रस्तांचे रायगड जिल्ह्यात पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, हाही निर्णय आता रद्द झाला असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वेळे ढेण येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातच करा. तसेच त्यांना शेतीयोग्य जमीन द्या. याबाबत येत्या महिनाभरात निर्णय घ्या, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
वेळे ढेण येथील कोयना प्रकल्पग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला मुख्यवनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उप संचालक डॉ. विनिता व्यास, प्रकल्प अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक (कोयना) तानाजी गायकवाड यांच्यासह कोयना प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पवार, रामचंद्र कोकरे पाटील, जगन्नाथ कोकरे, पांडूरंग कोकरे, लक्ष्मण कोकरे, गोविदं कोकरे, विलास कोकरे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
या बैठकीत रामचंद्र कोकरे आणि प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडून या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातच करण्यात येईल. त्यांना शेतीयोग्य जमीन देण्यात येईल, असे बेन यांनी यावेळी सांगितले. मात्र जमीन खडकाळ आणि मुरमाड असल्याने ती शेती योग्य नाही. आम्हाला शेतीयोग्य जमीन द्या, अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. यावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शेतीयोग्य जमिनीतीच करावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. तशी जमीन उपलब्ध नसल्यानस वनविभागाच्या उपलब्ध जमिनी देता येतील का, याचाही विचार करावा. तसेच येत्या महिनाभरात पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. प्रशासकीय अडथळे येत असतील तर, वेळे ढेण येथील २६ प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवा. आपण योग्य तो पाठपुरावा करु, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
येत्या महिनाभरात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांना सातारा जिल्ह्यात शेतीयोग्य जमिनी मिळतील यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन डॉ. बेन यांनी यावेळी दिले. बैठकीत झालेल्या सकारात्मक चचेर्मुळे पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न येत्या महिनाभरात सुटेल अशी आशा वेळे ढेण येथील प्रकल्पग्रस्तांनी यावेळी व्यक्त केली आणि आ. शिवेंद्रसिंहराजे व उपस्थित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.