कोरोना रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:38+5:302021-05-14T04:38:38+5:30
जिल्ह्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा मोठा धोका असल्याचा इशारा देण्यात येत ...
जिल्ह्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा मोठा धोका असल्याचा इशारा देण्यात येत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेपूर्वी सध्याच्या दुसऱ्या लाटेतच कऱ्हाड तालुक्यातील तब्बल २ हजार ४५९ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे समोर आणले. ० ते १ वर्षे वयोगटातील १३३ मुले व १०१ मुली तसेच १ ते १० वर्षे वयोगटातील १ हजार २४६ मुले व ९७९ मुली कोरोनाने बाधित झाल्या आहेत. मार्च २०२० ते मार्च २०२१ अखेर कोरोनाबाधित बालकांची संख्या केवळ ४१३ होती, तर एप्रिल २०२१ या एकाच महिन्यात तालुक्यातील २ हजार ४६ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बाधित बालकांची संख्या हजारोंच्या घरात असण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत मुलांमध्ये वाढलेले संक्रमण पाहता भविष्यात ही परिस्थिती आणखी भयावह बनण्याची चिन्हे आहेत. ‘लोकमत’ने सद्य:स्थितीत मुलांमध्ये वाढलेल्या संक्रमणाचा वेध घेत भविष्यातील संकटाची जाणीव करून दिली. त्याची दखल घेत खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. लहान मुलांसाठी कोरोना रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करा. त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा, असेही खासदार श्रीनिवास पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.
- चौकट
अनाथ मुलांची जबाबदारी घ्या!
कोरोनाच्या भीषण काळात दुर्दैवाने जी मुले आई, वडिलांच्या निधनानंतर अनाथ झाली आहेत. त्या मुलांची व्यवस्था करणे कर्तव्य आहे. त्यामुळे अनाथांच्या देखभालीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थेकडे द्यावी. जेणेकरून त्यांचे संगोपन उत्तम होईल, असेही खासदार श्रीनिवास पाटील यावेळी म्हणाले.
फोटो : १४केआरडी०३
कॅप्शन : ‘लोकमत’ वृत्त