जिल्ह्यातील लसीकरण मोहीम यशस्वी करा : श्रीनिवास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:40 AM2021-05-13T04:40:21+5:302021-05-13T04:40:21+5:30
कऱ्हाड : जिल्ह्यातील लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमधील समन्वय साधून प्रत्येक नागरिकांपर्यंत लस पोहोचवावी. ...
कऱ्हाड : जिल्ह्यातील लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमधील समन्वय साधून प्रत्येक नागरिकांपर्यंत लस पोहोचवावी. कोरोनाचा प्रादुर्भाव लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असल्याने त्यांच्यासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वार्ड राखीव ठेवण्यात यावेत, यांसह अन्य महत्त्वाच्या सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या सूचना मांडल्या.
खासदार पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाचा लहान मुलांमध्येही प्रादुर्भाव वाढत चालला आहे, ही चिंतेची बाब असून, त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठीचे स्वतंत्र वार्ड आतापासूनच तयार केले गेले पाहिजेत.’
लसीकरण मोहीम राबविताना जिल्ह्यात मोठा गोंधळ उडत आहे. योग्य नियोजन, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमधील समन्वय साधून असे प्रकार टाळता येतील. लसीकरण मोहीम योग्यरीत्या राबविण्यासाठी सुसूत्रता आणावी.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी इंजेक्शन वापरल्यानंतर त्या बाटल्या फोडून टाकण्यात याव्यात. कोविड सेंटर आणि जंबो कोविड सेंटर या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे. कोविड लढ्यासाठी मदत करणारे अनेक दानशूर व्यक्ती इच्छुक असतात. मात्र, अशा मदत करू पाहणाऱ्या जिल्हा व जिल्ह्याबाहेरील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयातून समन्वय साधण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, खा. श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधी कोविडसाठी वैयक्तिक मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे यावेळी सुपूर्द केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सिव्हिल सर्जन डॉ. सुभाष चव्हाण, सारंग पाटील, अन्य मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
फोटो..
१२खासदार
खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधी कोविडसाठी वैयक्तिक मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे यावेळी सुपूर्द केला.