कोरोनाबाधित रुग्णांशी मकरंद पाटील यांनी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:39 AM2021-04-27T04:39:17+5:302021-04-27T04:39:17+5:30
पाचगणी : पाचगणी येथील डाॅन अकॅडमी व बेल एअर हाॅस्पिटलमधील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन आमदार मकरंद पाटील ...
पाचगणी : पाचगणी येथील डाॅन अकॅडमी व बेल एअर हाॅस्पिटलमधील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन आमदार मकरंद पाटील यांनी रुग्णांची विचारपूस केली. त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचना केल्या. आमदारांच्या भेटीने रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले.
आमदार मकरंद पाटील यांनी रविवारी कोरोनाबाधितांची भेट घेतली. काही रुग्णांवर बेल एअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर काही रुग्णांना डाॅन अकॅडमी हॉस्टेलमध्ये तयार केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केले आहे. त्यांनी दोन्ही ठिकाणी जाऊन रुग्णाशी संवाद साधला. त्यांना धीर देत चौकशी केली. त्यांच्या समस्या जाणून घेत जेवण, नाष्टा वेळेवर मिळत आहे की, नाही याची विचारणा केली तसेच प्रशासनाच्याही अडचणी समजून घेतल्या.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार, नगरसेवक नारायण बिरामणे, फादर टाॅमी, संदिप बाबर, जतिन जोश, प्रकाश गोळे, सुनील सनबे उपस्थित होते.
चौकट
डॉन येथील शासनाच्या कोरोना सेंटरमध्ये पाचगणी नगरपरिषदेच्यावतीने अद्यावत पन्नास बेड बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे पन्नास ऑक्सिजन व पन्नास साधे बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बेलअर हॉस्पिटलवरील रुग्णांचा वाढता भार कमी होण्यास मदत होणार आहे.
पाचगणी, महाबळेश्वर परिसरात बाहेरील गाड्या येऊच नयेत तसेच पाचगणीलगतच्या कोरोनाबाधित व्यक्ती येऊ नयेत म्हणून अटकाव करावा. यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा, अशी सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाचा सामना धैर्याने करत लवकरच आपल्या सर्वांच्या साथीने तालुका लवकरच कोरोनामुक्त करावयाचा आहे. त्याकरिता सर्वांचे योगदान अनमोल आहे.
- मकरंद पाटील,
आमदार